पावसाची दमदार हजेरी; शेतकरी सुखावला
By Admin | Updated: July 12, 2015 00:47 IST2015-07-12T00:47:55+5:302015-07-12T00:47:55+5:30
१० ते १२ दिवसापासून पावसाने दडी मारली होती पण आज सकाळपासून चौरास भागात दमदार पावसाने हजेरी लावल्याने ..

पावसाची दमदार हजेरी; शेतकरी सुखावला
पेरणीची लगबग : जिल्ह्यात काही ठिकाणी रोवणीला प्रारंभ
कोंढा (कोसरा) : १० ते १२ दिवसापासून पावसाने दडी मारली होती पण आज सकाळपासून चौरास भागात दमदार पावसाने हजेरी लावल्याने कोरडवाहू शेतकरी थोडासा सुखावला आहे. शेतकऱ्यांवर दुबार पऱ्हे लावण्याचे संकट सध्या तरी तळले आहे.
पवनी तालुक्यातील कोंढा परिसर चौरास म्हणून ओळखलो जातो. या भागात गेल्या अनेक वर्षापासून सततची नापिकी, गारपीट, अतिवृष्टी या अस्मानी संकटाचा मुकाबला चौरास भागातील कोरडवाहू शेतकरी करीत आहे. गेल्या १२ दिवसापासून पावसाने दडी मारली होती. पऱ्हे वाळण्यास सुरवात झाली होती. निसर्गाने दोन दिवसापासून कृपा दाखविल्याने सध्या संकट टळले आहे.
मृग नक्षत्रात परिसरात चांगला पाऊस पडला म्हणून शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पऱ्हे कडक उन्हामुळे तापून सुकत होते. अशावेळी शेतकरी इकडून तिकडून पाणी देऊन पऱ्हे जगवू लागला होता. यातच बुधवारला गोसे प्रकल्प डावा कालवा विभागाने डाव्या कालव्यात पाणी सोडले. त्यामुळे शेकडो हेक्टर शेतीतील पऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी इंजिनद्वारे शेतकरी पाणी देत आहे.
पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात गोसे प्रकल्पाचा डावा कालवा जाते या कालव्यात पाणी चार महिने राहिले तरी आजुबाजूचे शेतकरी खरीप, रब्बी पिक घेवू शकतात. सध्यातरी चौरासचा शेतकरी अनेक संकटाचा मुकाबला करून उभा आहे.
राज्य शासनाने अल्पभुधारक शेतकऱ्यांना मदतीचा हात देताना पूर्ण एकदा कर्जमुक्ती देण्याची गरज आहे, असे शेतकरी बोलताना दिसतात. कोरडवाहू शेतकऱ्यांना निसर्ग व शासनाची मदत मिळाल्याशिवाय उभा राहणार नाही, असे लहान शेतकरी बोलत आहे. सध्यातरी दुबार पेरणीचे संकट टळले आहे. शेतकरी सुखावला असून पेरणीच्या कामाला जोमाला लागला आहे. (वार्ताहर)