शहरात ऊन्ह-पावसाचा खेळ
By Admin | Updated: October 8, 2014 23:21 IST2014-10-08T23:21:14+5:302014-10-08T23:21:14+5:30
निसर्गापुढे कुणाचे काहीच चालत नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा कधी फटका तर कधी समाधान मिळते. भंडारा शहरात आज बुधवारला निसर्गाचा असाच अनुभव नागरिकांना अनुभवाला मिळाला.

शहरात ऊन्ह-पावसाचा खेळ
भंडारा : निसर्गापुढे कुणाचे काहीच चालत नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा कधी फटका तर कधी समाधान मिळते. भंडारा शहरात आज बुधवारला निसर्गाचा असाच अनुभव नागरिकांना अनुभवाला मिळाला. सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत शहरातील काही वॉर्डाला अक्षरश: झोडपुन काढत असताना दुसरीकडे मात्र अर्ध्या शहरात लख्ख सुर्यप्रकाश होता.
महिनाभरानंतर सोमवारी पावसाने परतीची हजेरी लावली होती. बुधवारी सकाळपासून निरभ्र वातावरण असल्याने लख्ख सुर्यप्रकाश पडला होता. कुणालाही पाऊस येईल, असे वाटत नव्हते. अशातच शहरातील राजीव गांधी चौकापासून पुढील काही वॉर्डात म्हणज अर्ध्या शहरात सकाळी ११ वाजेपासून दुपारी साडेबारा वाजतापर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेकांची त्रेधातिरपिट उडाली. लख्ख उन्हात घरून निघालेल्यांची अचानक बरसलेल्या पावसामुळे चांगलीच फजिती झाली.
अनेकांनी मिळेल तिथे किंवा दुकानाच्या आडोशाला लपून पावसापासून स्वत:चा बचाव केला. तर अनेकजण मुसळधार पावसात सापडल्याने चिंब भिजले. शहरातील राजीव गांधी चौक परिसर, गांधी चौक, नेहरू वॉर्ड मेंढा, सहकार नगर व अन्य काही वॉर्डात मुसळधार पाऊस पडत असताना राजीव गांधी चौक ते जिल्हा परिसर चौक परिसर व काही वॉर्डात चक्क लख्ख सुर्यप्रकाश पडत होता.
एकीकडे पावसाने नागरिक ओलेचिंब झाले होते तर दुसरीकडे कडक उन्हामुळे अनेकजण घामाने ओले झाल्याची प्रचिती आली. पावसाने भिजल्याने ओलेचिंब होऊन येणाऱ्यांकडे उन्हातील नागरिक आश्चर्याने बघत होते. भंडारा शहरवासीय बुधवारी निसर्गाच्या उन्ह - पावसाची लिला पाहून आश्चर्यचकित झाले. (शहर प्रतिनिधी)