आरोग्यवरील ताण वाढला, ४९२ अधिकारी-कर्मचाऱ्यांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:35 IST2021-04-01T04:35:50+5:302021-04-01T04:35:50+5:30
सुविधांचा खालावणारा दर्जा आणि खासगी रुग्णालयांत उपलब्ध होत असलेल्या दर्जेदार सुविधांमुळे अनेकांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्याकडे पाठ फिरविली आहे. ...

आरोग्यवरील ताण वाढला, ४९२ अधिकारी-कर्मचाऱ्यांची गरज
सुविधांचा खालावणारा दर्जा आणि खासगी रुग्णालयांत उपलब्ध होत असलेल्या दर्जेदार सुविधांमुळे अनेकांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्याकडे पाठ फिरविली आहे. नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्याचबरोबर आपत्कालीन स्थितीत नागरिकांना त्वरित वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयाची स्थापना करण्यात आली. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधिनस्त तुमसर व साकोली या दोन ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आहे, तर ग्रामीण रुग्णालय सात आहेत. यात पवनी, लाखांदूर, मोहाडी, लाखनी, सिहोरा, अड्याळ, पालांदूरचा समावेश आहे. यासह जिल्हा परिषद अंतर्गत ३३ प्राथिमक आरोग्य केंद्रे, १९३ उपकेंद्रे, आदी आरोग्य संस्था आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांसह इतर आजारांचे रुग्ण भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होत आहेत. या रुग्णालयात भंडारा जिल्ह्यासह नागपूर, गोंदिया, तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांतील रुग्ण दाखल होत असतात. त्यामुळे रुग्णालयावरील ताण दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णालयात असलेल्या सोयी-सुविधा अपुऱ्या पडत असल्याची स्थिती आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज निर्माण झाली आहे.