रिक्त पदांमुळे आरोग्य विभाग खिळखिळे
By Admin | Updated: September 29, 2014 23:00 IST2014-09-29T23:00:03+5:302014-09-29T23:00:03+5:30
ग्रामीण तथा शहरी जनतेचे आरोग्य सुरळीत रहावे, त्यांना आरोग्याच्या सुविधा पुरविणे हे आरोग्य विभागाचे कर्तव्य आहे. मात्र जिल्ह्यात विविध संवर्गातील ११८ पदे रिक्त असल्याने नागरिकांना आरोग्य

रिक्त पदांमुळे आरोग्य विभाग खिळखिळे
भंडारा : ग्रामीण तथा शहरी जनतेचे आरोग्य सुरळीत रहावे, त्यांना आरोग्याच्या सुविधा पुरविणे हे आरोग्य विभागाचे कर्तव्य आहे. मात्र जिल्ह्यात विविध संवर्गातील ११८ पदे रिक्त असल्याने नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरत आहे. रिक्त पदांमुळे हा विभाग पर्यायाने 'पंगू' झाल्याची प्रचिती येत आहे.
ग्रामीण व शहरी नागरिकांना उत्तमोत्तम आरोग्य सुविधा कमी खर्चात पुरविण्यासाठी आरोग्य विभाग कटीबध्द आहे. ग्रामस्थांना आरोग्य सुविधा पुरविता याव्या, यासाठी शासनाने तालुकास्तरावर उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रांची निर्मिती केली आहे. या केंद्रांतून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तिथे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व अन्य प्रवर्गाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहे. नागरिकांना मोफत औषध पुरविण्याचे आदेश असले तरी, अनेक शासकीय रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने रूग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून औषध घ्यावी लागते.
जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यातील सरळसेवा व पदोन्नती संवर्गातील ११८ पदे रिक्त आहे. सरळसेवा संवर्गातील मंजूर पदांपैकी काही पदे भरण्यात आली असून अनेक पदे रिक्त आहेत. हीच स्थिती पदोन्नती संवर्गातील आहे. जिल्ह्यातील रिक्त पदांमध्ये वैद्यकीय अधिकारी वर्ग २ गटातील १०८ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून त्यातील २४ पदे रिक्त आहेत. तांत्रिक कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य सेवक, सेविका, औषधी निर्मिता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक, अ-वैद्यकीय पर्यवेक्षक व कुष्ठरोग तंत्रज्ञ या संवर्गातील ४९१ पदांना मंजुरी प्राप्त असून ६२ पदे अजूनही रिक्त आहेत. अतांत्रिक संवर्गातील कनिष्ठ सहाय्यक, तालुका आरोग्य अधिकारी, परिचर या संवर्गातील सरळसेवेतील १७२ मंजूर पदांपैकी ७ पदे रिक्त आहेत. सफाई कामगार, वाहन चालक या संवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहे.
अंशकालीन महिला परिचर संवर्गातील २६ पदे रिक्त आहेत. शेकडोंच्या संख्येत रिक्त पदांच्या भरोशावर आरोग्य विभागाचे काम सुरू असून यामुळे नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यापासून वंचित रहावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी)