गोपनीयता भंगप्रकरणी आरोग्य विभागाची धावाधाव
By Admin | Updated: April 22, 2016 01:56 IST2016-04-22T01:56:56+5:302016-04-22T01:56:56+5:30
पहेला आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गोपनीय ठेवण्यात येणारे बयान सार्वजनिक करण्यात आल्याचे वृत्त

गोपनीयता भंगप्रकरणी आरोग्य विभागाची धावाधाव
भंडारा : पहेला आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गोपनीय ठेवण्यात येणारे बयान सार्वजनिक करण्यात आल्याचे वृत्त 'लोकमत'मध्ये आज प्रकाशित होताच आरोग्य विभागाच्या वर्तुळात एकच खळबळ माजली. पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी वृत्ताची दखल घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे गोपनीयता भंग प्रकरणी ते कोणता निर्णय घेतात, याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.
पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत असलेल्या दवडीपार उपकेंद्रातील कपाटात व टेबलावर अस्ताव्यस्त स्थितीत हजारो रुपयांची लस वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता कविश्वर यांच्या भेटी दरम्यान आढळली. सदर लस चुकुन बालकांना दिल्या गेली असती तर जीवितहानी झाली असती. सदर प्रकरण गंभीर असल्याने डॉ. कविश्वर यांनी वरिष्ठांकडे अहवाल सादर केला. त्यानंतर चौकशी समिती गठित करण्यात आली. तीनदा कर्मचारी व अधिकाऱ्यांचे बयान नोंदविण्यात आले. नोंदविलेले बयान नियमानुसार गोपणीय ठेवले जातात. मात्र हे बयान आरोग्य केंद्राच्या इ-मेलवर पाठविण्यात आले. त्यामुळे ती माहिती सार्वजनिक झाली. याची तक्रार जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र गोपनीयता भंगप्रकरणी अद्यापही कारवाई करण्यात आली नाही. गोपनीय माहिती झाली सार्वजनिक या शिर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त झळकताच जिल्हा प्रशासन हादरले. आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली. सकाळपासून पहेला आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद आरोग्य विभागात एकच धावपळ दिसून आली. आज पालकमंत्री डॉ.दिपक सावंत जिल्ह्यात असल्यामुळे अनेकांच्या नजरा त्यांच्या निर्णयाकडे लागले होते. मात्र त्यांना या संबंधी माहितीच नसल्याचे त्यांनी सांगितले. पहेला येथील आरोग्य केंद्रात सर्व कर्मचारी, अधिकारी वेळेवर हजर झाले होते. केंद्रासह आवाराची साफसफाई केल्याचे दिसून आले. कर्मचारी गणवेशात दिसून आले. आज दिवसभर या विषयावरून चर्चा रंगलेली होती. जिल्हा परिषदमध्ये आयोजित बैठक आटोपल्यानंतर चौकशी समितीतील अधिकारी आरोग्य विभागाच्या कक्षात दाखल झाले होते. गोपनीयता भंग प्रकरणी त्यांना पाचारण करण्यात आल्याचे समजते. त्यांच्या अहवालावर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याचीही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे येत्या ७ दिवसात कारवाईचा बडगा उगारण्याची शक्यता नाकारता येत नाही. (नगर प्रतिनिधी)
अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बयाण सार्वजनिक करणे चुकीचे आहे. याप्रकरणाची माहिती अधिकाऱ्यांकडून मागून स्वत: या प्रकरणाकडे लक्ष घालणार आहे.
- डॉ.दीपक सावंत, पालकमंत्री, भंडारा
पहेला येथील प्रकरणाची माहिती वृत्तपत्रातून कळली. या प्रकरणाकडे जातीने लक्ष घालणार आहे. याविषयी आरोग्य विभागाकडून माहिती घेता येईल.
- धीरजकुमार जिल्हाधिकारी, भंडारा
बयान गोपीनीयता प्रकरणी मला माहिती नाही. पालकमंत्र्यांच्या बैठकीमुळे आज सकाळपासून व्यस्त कार्यक्रम होते. उद्या या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लक्ष घालणार आहे.
- राजेंद्र निंबाळकर मुख्य कार्यपालन अधिकारी, भंडारा