आरोग्याबाबत जागरूक पण साेशल मीडिया वापरात बेफिकीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST2021-04-07T04:36:48+5:302021-04-07T04:36:48+5:30
काेराेना संसर्ग हाेण्यापूर्वीचा काळ आणि आता यात जमीन-अस्मानचा फरक पडला आहे. आधी तेलकट, तुपकट पदार्थांचे सेवन करून कोलेस्टेरॉल वाढविला ...

आरोग्याबाबत जागरूक पण साेशल मीडिया वापरात बेफिकीर
काेराेना संसर्ग हाेण्यापूर्वीचा काळ आणि आता यात जमीन-अस्मानचा फरक पडला आहे. आधी तेलकट, तुपकट पदार्थांचे सेवन करून कोलेस्टेरॉल वाढविला जात हाेता. कुठेही चमचमीत पदार्थ दिसले की त्यावर ताव मारला जात हाेता. परंतु आता अगदी साध्या जेवणाकडे सर्वांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. तेलकट पदार्थांऐवजी फळांचा वापर जेवणात वाढला आहे. हिरव्या पालेभाज्यांकडे अनेकजण वळले असून हाॅटेलपेक्षा घरीच जेवणाकडे कल वाढला आहे. राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहेत. पहाटे फिरायला जाणे, व्यायाम हाही आता अनेकांच्या दैनंदिनीचा भाग झाला आहे.
काेराेना संसर्गामुळे अनेकांची मन:स्थिती बिघडली आहे. काेराेनाच्या संकटाने अनेकांच्या नाेकऱ्या गेल्या. व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे त्यांच्यात नैराश्य येत आहे. कुटुंबात विसंवाद वाढत आहे. सतत माेबाईलवर राहत असल्याने डाेळ्याचे आजार जडले असून अनेकांची झाेप उडाली आहे. अशा व्यक्तींचे समुपदेशन करण्याची गरज आहे. मानसाेपचारतज्ज्ञ डाॅ. रत्नाकर बांडेबुचे म्हणाले, सकारात्मक विचार हा यावरचा प्रभावी उपाय आहे. आपल्या कुटुंबाला वेळ द्यावा, डाेक्यात आलेले विचार तणावपूर्ण असतील ते इतरांशी शेअर करावे, एखादा छंद जाेपासावा, माेबाईल व इंटरनेटचा वापर गरजेपुरता करावा, असे त्यांनी सांगितले.
काेराेना संकटाने अनेकांना माेबाईलचे व्यसन जडले आहे. माेबाईलवर येणारा प्रत्येक संदेश खरा मानणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे. अलीकडे काेराेनाबाबतच्या विविध माहितींचा खच साेशल मीडियातून पडत आहे. यातील नेमके खरे काेणते आणि खाेटे काय, हे कळायला मार्ग नसताे. मात्र अनेकजण त्यावर येणारी माहिती खरी मानत आहेत. काेराेनावर विविध उपाय सांगून दिशाभूल करणारे मॅसेजही साेशल मीडियातून फिरत असतात. मात्र अशा मॅसेजबाबत कुणी तक्रार करीत नाही की कारवाईही केली जात नाही. जे साेशल मीडियात आले ते खरे मानून अनेकजण पॅनिक हाेत असल्याचे अलीकडे दिसून येत आहे. यासाठी प्रत्येकाने सदसदविवेक बुध्दीचा वापर करावा. काेणताही उपचार करण्यापूर्वीचा डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
तर सायबर कायद्यांतर्गत हाेऊ शकते कारवाई
n अफवा पसरविणे हा कायद्याने गुन्हा आहे. साेशल मीडियाच्या माध्यमातून आराेग्य असाे की इतर काेणत्याही बाबतीत अफवा पसरविणे गुन्हाच आहे. कुणी याबाबत तक्रार दाखल केली तर त्यांच्यावर सायबर कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते, असे भंडाराचे अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी सांगितले. कुणी अफवा पसरवित असेल तर त्याचे अकाऊंट थांबविण्यापासून माेबाईल, कॉम्प्युटर व इतर डिव्हाईस जप्त करण्याची कारवाई करता येते. फेक आयडी असणाऱ्यांचाही शाेध घेतला जाताे. यासाठी तक्रारीची गरज असल्याचे भारती यांनी सांगितले.