‘त्या’ मुख्याध्यापकाला भाजपाने नाकारला प्रवेश
By Admin | Updated: January 20, 2015 00:01 IST2015-01-20T00:01:00+5:302015-01-20T00:01:00+5:30
खाजगी शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असूनही सतत राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या आणि व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या त्या मुख्याध्यापकाला भाजपाने पक्षात प्रवेश नाकारला आहे़

‘त्या’ मुख्याध्यापकाला भाजपाने नाकारला प्रवेश
भंडारा : खाजगी शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असूनही सतत राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या आणि व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या त्या मुख्याध्यापकाला भाजपाने पक्षात प्रवेश नाकारला आहे़ भाजपा पदाधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवून अखेर हताश झालेल्या या मुख्याध्यापकाची आता वरीष्ठ पातळीवर लॉबिंग सुरू आहे़
राज्यात १५ वर्ष आघाडीचे शासन असताना लागेबांधे तसेच साम, दाम, दंड, भेद या नितीचा वापर करून सदर मुख्याध्यापकाने शिक्षण मंडळ सदस्यपदी स्वत:ची वर्णी लावून घेतली होती़ तथापि, केंद्र संचालक व अतिरीक्त केंद्र संचालकाच्या नियुक्तीसाठी वसुली करणे, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार चालू देणे, राजकीय पुढाऱ्यांसोबत राहून शाळा संचालकांवर दबाव टाकणे असे अनेक गैरप्रकार उघडकीस आले होते़ यासंदर्भात शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारीही झाल्या होत्या़
पक्षाशी एकनिष्ठ असल्याचा दावा करणाऱ्या या मुख्याध्यापकाने काही महिन्यापूर्वीच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मागितली होती. यासाठी दिल्ली व मुंबईपर्यंत येरझारा घातल्या होत्या. मात्र, काँग्रेस पक्षश्रेष्ठीने त्याच्या विनंतीअर्जाला केराची टोपली दाखविली़
दरम्यान, काही महिन्यापूर्वी शिक्षण मंडळ सदस्यपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर मुख्याध्यापकाने पुन्हा या पदावर आपली नियुक्ती करवून घेण्यात यश मिळविले़ काही मंत्री व काँग्रेस नेत्यांच्या फोटोसह बॅनरही लावले होते़ परंतु, थेट राज्यपालापर्यंत तक्रारी झाल्यानंतर शिक्षण मंडळ सदस्यपद वांध्यात आले आणि लागलेले बॅनर काढून घ्यावे लागले़
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात भाजपा- शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले़ शिक्षण मंडळ सदस्य हे पद गेल्यामुळे कासाविस झालेल्या या मुख्याध्यापकाने दोन महिन्यापासून भाजपात प्रवेशासाठी लॉबिंग चालविली होती़ भाजपा संघटनेत महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडे त्याने धाव घेतली़ मात्र, पक्षात प्रवेश दिल्यास फायदा कमी आणि नुकसान अधिक होणार असल्याचे हेरून या मुख्याध्यापकाला भाजपात प्रवेश नाकारण्यात आला आहे.
स्थानिक पातळीवर डाळ शिजत नसल्याचे पाहून त्याने नागपूर जिल्ह्यातील एका आमदारामार्फत पक्षप्रवेशाची शिफारसही केली. इतकेच नव्हे तर, शिक्षण मंडळ सदस्यपदी पुन्हा वर्णी लावावी म्हणून विनंतीही केली आहे़ मात्र, भाजपातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना पक्षात घेण्यासाठी ठाम विरोध दर्शविल्यामुळे पक्षप्रवेशचे दार बंद झाले आहे़ (जिल्हा प्रतिनिधी)