‘तो’ लाकुडफाटा वनपरिक्षेत्राधिकाऱ्याच्या घरी
By Admin | Updated: September 8, 2016 00:33 IST2016-09-08T00:33:22+5:302016-09-08T00:33:22+5:30
भंडारा उपवन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोका विश्रामगृहाची दुरुस्ती करण्यात आली.

‘तो’ लाकुडफाटा वनपरिक्षेत्राधिकाऱ्याच्या घरी
लाकडाची अफरातफर : वनपरिक्षेत्राधिकाऱ्याचे अनेक प्रकरण आले बाहेर
प्रशांत देसाई भंडारा
भंडारा उपवन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोका विश्रामगृहाची दुरुस्ती करण्यात आली. यावेळी निघालेला लाकुड फाटा लिलावात काढण्याचे आदेश तत्कालीन उपवनसंरक्षक प्रवीणकुमार यांनी दिले होते. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेश्राम यांनी सर्व लाकुड साहित्य भंडारा येथे बोलावून अफरातफर केली तर काही साहित्य त्यांच्या क्वॉर्टरमध्ये दडवून ठेवलेला आहे.
लाखो रुपये किमतीचे सागवान साहित्य ज्यात चौकटसह दरवाजे, फाटे, सिमेंट टिन पत्रे व अन्य लाकडी साहित्य कोका विश्रामगृहाच्या दुरुस्तीदरम्यान काढण्यात आले. हे सर्व साहित्य गडेगाव लाकूड आगारात नेऊन लिलावात काढण्याचे आदेश तत्कालीन उपवनसंरक्षक प्रवीणकुमार यांनी वनपरिक्षेत्राधिकारी यांना बजावले होते. मात्र प्रवीणकुमार यांची भंडारा येथून बदली होताच वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम यांनी लिलावात काढण्याच्या त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून स्वत:च्या पदाचा गैरवापर करताना कोका विश्रामगृहाचे वनपाल खान यांना पत्रव्यवहार केला.
या पत्रव्यवहारात त्यांनी सर्व लाकूड साहित्य भंडारा येथे त्यांच्या अधिनस्थ बोलाविले. यातील काही साहित्यांची अफरातफर केल्याची चर्चा वनकर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे. सदर प्रकरण ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम यांनी अफरातफर केलेल्या लाकुडसाहित्यांची जमवाजूत करून पूर्ववत स्वत:च्या क्वॉर्टर परिसरात आणून टाकले. यातील सुस्थितीत असलेले सागवान फाटे व अन्य काही साहित्य त्यांनी चोरी जात असल्याचा बनाम करून ते स्वत:च्या क्वॉर्टरमध्ये ठेवले. वनविभागाची मौल्यवान वनसंपदा चोरीला गेल्याचे अद्याप एकही प्रकरण वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय परिसरात घडलेले नाही. त्यामुळे हा लाकूड साठा चोरी जात असल्याचा बनाम असल्याचे उघडकीस येते.
वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम यांनी सदर लाकूडसाठा क्वॉर्टरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी व त्याचे वेगवेगळे भाग बनवून ठेवले आहेत. ही बाब प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्या क्वॉर्टरमध्ये प्रत्यक्षात बघितली आहे. या एका प्रकरणावरून मेश्राम यांचे अनेक प्रकरण आता बाहेर येऊ लागले आहेत. वनविभागाच्या विभागीय कार्यालयाची दुरुस्ती करण्यात आली. यावेळी तेथील काही लाकडी कपाटही गायब झाल्याची बाब आता उघडकीस आली आहे. यातीलच काही लाकडी कपाट मेश्राम यांच्या क्वॉर्टर परिसरात ठेवण्यात आले असल्याने त्यांनी ते कुठल्या कारणाने आणले याबाबत अनभिज्ञता आहे.