आईवडिलांसोबत मैत्रीभाव ठेवा
By Admin | Updated: August 31, 2016 00:28 IST2016-08-31T00:28:13+5:302016-08-31T00:28:13+5:30
आजच्या युगात जो शिकला तोच टिकला. नावापुरते शिक्षण न घेता कौशल्य विकासाकडे वळा.

आईवडिलांसोबत मैत्रीभाव ठेवा
निशा सावरकर यांचे प्रतिपादन : ओम सत्यसाई महाविद्यालयात विविध कार्यक्रम
जवाहरनगर : आजच्या युगात जो शिकला तोच टिकला. नावापुरते शिक्षण न घेता कौशल्य विकासाकडे वळा. सुप्तगुणांना चांगल्या रितीने चालना द्या. विशेष करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पुढील आवाहनांना सामोरे जाऊन गुणवत्ता प्राप्त प्राविण्य मिळवा. यामधून व्यक्तीमत्व प्राप्त होते. थोरामोठ्यांचा आदर्श व आईवडीलांशी मैत्री ठेवणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन नागपूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष निशा सावरकर यांनी व्यक्त केले.
ओम सत्यसाई कला विज्ञान महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय परसोडी जवाहरनगर येथे माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी नागपूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती टेकचंद सावरकर, ओम सत्यसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष वाडीभस्मे, उपाध्यक्ष वसंतराव कारेमोरे, सचिव शिवदास उरकुडे, सहसचिव चंद्रशेखर गिरडे, प्रभारी प्राचार्य दिलीप पाटील, पालक प्रतिनिधी धनराज राखे, परसोडीचे सरपंच पंकज सुखदेवे, उपसरपंच दर्शन फंदे, ठाणाचे सरपंच कल्पना निमकर, ओमप्रकाश देशमुख, लंकेश उरकुडे, बादल मेहर, मुन्ना भोंगाडे उपस्थित होते.
माजी सभापती टेकचंद सावरकर यांनी, सत्कार, वाढदिवस, थोरा मोठ्यांचा आदर्श त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा होत असतो. माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे हे त्यातीलच एक आहे. माणूस हा पक्षाने मोठा होत नसतो, तर त्यांच्यामधील कर्तृत्वाने मोठा होतो. जनतेची नि:स्वार्थ अविरत सेवा हीच खरी शिक्षण म्हणावे. नोकरी मिळविण्यापेक्षा उद्योगाभिमुख शिक्षण घ्या. जीवनाचे साफल्य करण्यासाठी ध्येय उद्दीष्ट ठेवा, असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात सत्कारमूर्ती बंडूभाऊ सावरबांधे यांनी, लोकसेवा हा खरा मानवतेचा धर्म आहे. जनतेच्या मनातील मर्म जाणून व समजून लोकहितार्थ सेवा करा. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी उत्तूंग भरारी मारलेली आहे. ही सर्व एका शिक्षणाने घडवून आणलेली किमया आहे. याकरिता प्रथम विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करा. यश आपोआप तुमच्या पाठीशी राहिल, असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी महाविद्यालय परिसरात पाम, अशोकाची चिंच वृक्षांचे वृक्षारोपण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात निबंध स्पर्धेत आम्रपाली मोटघरे, प्रणाली लांजेवार, पोष्टर स्पर्धेत शना शेख, स्नेहा ठवकर, देशभक्तीपर गीत गायन मध्ये नेहा तिजारे, दिपीका कुशवाह, रांगोळी स्पर्धेत ममीता साकुरे, मीना किरपानकर, विज्ञान युगात विद्यार्थ्यांना मोबाईलची आवश्यकता या विषयावर वादविवाद स्पर्धेत मयूर बांगरे, किरण मस्के या विजयी स्पर्धकांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते रोख पारितोषिक देण्यात आले. प्रास्ताविक सुभाष वाडीभस्मे यांनी केले. संचालन प्रा.ज्योती रामटेके यांनी केले. आभार प्रभारी प्राचार्य दिलीप पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)