तलाव स्वच्छतेसाठी सरसावले सामाजिक बांधिलकीचे हाथ
By Admin | Updated: October 1, 2015 00:46 IST2015-10-01T00:46:47+5:302015-10-01T00:46:47+5:30
श्रद्धा आणि मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पाचे विसर्जन झाले असले तरी ज्याठिकाणी विसर्जन केले...

तलाव स्वच्छतेसाठी सरसावले सामाजिक बांधिलकीचे हाथ
लोकमत शुभ वर्तमान : वरठीत स्वच्छतेचा ध्यास
तथागत मेश्राम वरठी
श्रद्धा आणि मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पाचे विसर्जन झाले असले तरी ज्याठिकाणी विसर्जन केले त्याठिकाणी मूर्तीचे अवशेष पाण्यावर तरंगत होते. हा प्रकार लक्षात येताच विरेंद्र देशमुख, पुष्पा भुरे व बंडू निंबार्ते यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत तलावातून ते बाहेर काढून स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला.
यापूर्वी विसर्जनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी या तलावाची स्वच्छता केली होती. दहा दिवस अपार श्रद्धा मनात ठेवून बाप्पाच्या सेवेत तरुणाचे जत्थे कार्यरत दिसतात. ज्या भागात आगमन होते तिथे उत्सव आणि मनोभावे पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीपासून विसर्जन सुरु होते. या दरम्यान ही बाप्पांप्रती असलेली श्रद्धा बाळगून असतात. विसर्जन करताना कंठ दाटून येतो. पण ज्याठिकाणी विसर्जन होते, त्याठिकाणी दुसऱ्या दिवशी कुणी ढुंकुनही पाहत नाही. श्रद्धेने पूजलेले दैवत आणि त्यासाठी वापरलेले साहित्य पाण्यात गटांगळ्या खाताना दिसतात. वरठीतही असे भयानक दृश्य होते. गावातील तिघांनी पुढाकार घेऊन तलाव स्वच्छ केले. हजारोंच्या दानातून विसर्जीत झालेल्या बाप्पाला गावात तीनच हात उपयोगाचे सापडले. वरठी येथे सार्वजनिक उत्सवादरम्यान सर्व मूर्तीचे विसर्जन रेल्वेच्या तलावात होते. सदर तलाव गावाच्या मध्यभागी आहे. रेल्वे विभागाच्या दुर्लक्षित धोरणाचा फटका गावकऱ्यांना बसत आहे. तलावात घाणच घाण पसरली आहे. या तलावात पाणी मोठ्या प्रमाणात असले तरी तलावातील घाण उपसा न झाल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
नाईलाजास्तव गावकऱ्यांना मूर्तीचे विसर्जन या तलावात करावे लागते. अनंत चतुर्दशीपासून सुरु झालेले विसर्जन काल संपले. पण ज्याठिकाणी हे विसर्जन झाले त्या भागात विसर्जीत मूर्तीचा इतर भाग, हार व पुजेसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्यावर तरंगत होते. मूर्तीचे अवशेष पाण्यावर तरंगतांना पाहून ओबीसी सेवा संघाचे तालुकाध्यक्ष विरेंद्र देशमुख, पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे व गावात घरोघरी जावून ब्रेड विकणारे बंडू निंबार्ते यांनी तलावाची स्वच्छ करण्याची मोहीम हातात घेतली. यासाठी त्यांनी अनेकांना येण्याचे आवाहन केले. पण श्रद्धेने व्याकुळ, बाप्पांना निरोप देणारे आणि डी.जे.च्या तालात नाचणारे एकही यात सहभागी झाले नाही. परंतु ज्या श्रद्धेने बाप्पाचे पूजन होते त्याच श्रद्धेने सेवा करण्यासाठी तरुणाईसमोर आली पाहिजे.