पाळ फुटून शेकडो एकरातील धानपीक बुडाले
By Admin | Updated: September 17, 2016 00:45 IST2016-09-17T00:45:10+5:302016-09-17T00:45:10+5:30
मोहगाव शेतशिवरातील लघु पाटबंधरे विभागाच्या तलावाची पाळ फुटली. तलावाच्या पाण्यामुळे परिसरातील ५ किमी अंतरावरच्या पिकांना फटका बसला आहे.

पाळ फुटून शेकडो एकरातील धानपीक बुडाले
धानपीक जलमय : वरठी-मोहगाव रस्ता वाहून गेला, नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी
वरठी : मोहगाव शेतशिवरातील लघु पाटबंधरे विभागाच्या तलावाची पाळ फुटली. तलावाच्या पाण्यामुळे परिसरातील ५ किमी अंतरावरच्या पिकांना फटका बसला आहे. या भागातील ३० ते ४० शेतकऱ्यांच्या २०० एकरातील धानपीक पाण्यााखाली असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
वरठी गावालगत लघु पाटबंधारे विभागाचे दोन तलाव आहेत. १९८० च्या दशकातील हे तलाव दुर्लक्षीत आहेत. मागील ३५ वर्षापासुन या तलावाकडे लघु पाटबंधारे विभागाने पाहले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केली आहे. देखभाल दुरूस्ती नसल्यामुळे तलावाच्या एका भागात अनेक दिवसांपासून पाणी वाहत होते. नहराचे पाणी सुरू असल्यामुळे तलावात पाणी भरून होते. आज शुक्रवारला दुपारपासून तलावाच्या पाळीची माती निघणे सुरू झाले होते. त्यातून कमी प्रमाणात पाणी वाहत होते. सायंकाळच्या सुमारास तलावाच्या पाळीच्या मोठ्या भागाने जागा सोडल्यामुळे तलावातील पाणी शेतात शिरले. काही वेळेपुरते संपुर्ण परिसर पाण्यात बुडाले होते. अजुनही शेकडो एकर शेती पाण्याखाली असुन या शेतातील पीक नष्ट झाले आहे.
या तलावाच्या परिसरात वरठी, मोहगाव, सोनुली येथील शेतकऱ्यांची शेती आहे. यात पुरूषोत्तम मरघडे, वामन मरघडे, रामप्रसाद मरघडे, भाग्रता देशमुख, झिंगर मरघडे, मंगर मरघडे, प्यारेलाल मरघडे, गुलाब वाल्मीक, लक्ष्मण थोटे, वामन थोटे, शामराव थोटे, नामदेव थोटे, संतोष थोटे, राजु भाजीपाले, विश्वकांत भुजाडे, चंद्रकांत भुजाडे, शशिकांत भुजाडे, पवनदास मेश्राम, दामोधर गायधने, शिवा गायधने, भिवा गायधने, सुधाकर गायधने, गंगाधर गायधने यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे शेतपिक पाण्यात बुडाले आहे.
तलावाची पाळ फुटल्यानंतर प्रत्यक्ष भेटीदरम्यान वरठीचे सरपंच संजय मिरासे यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या तलावाची पाळ फुटल्याचा आरोप केला आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. (वार्ताहर)
देव तारी त्याला कोण मारी !
ज्ञानेश्वर मरघडे यांचे शेत तलावाला लागून आहे. घटनेच्या वेळी ज्ञानेश्वर हा शेतातील कामे आटोपून तलावाच्या पाळीने बैलबंडीने जात होता. दरम्यान, पाळ फुटल्याचा त्याला मोठ्याने आवाज आला. त्यानंतर बैल एकाच ठिकाणी थांबले. त्यावेळी बैलबंडी आणि ज्ञानेश्वर हा घटनास्थळापासून केवळ १० फुट अंतरावर होता. आवाजामुळे बैल सैरावैरा पळाले असते तर बैलबंडीसह पाण्यात वाहून गेलो असतो. नशिब बलवत्तर म्हणूनच बचावलो, अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वरने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
रहदारीचा रस्ता गेला वाहून
तलावापासून दोन किमी अंतरावर असलेला वरठी-मोहगाव हा रस्ता पाण्याुळे वाहून गेला. नहराच्या पुलावर पाणी जाण्यासाठी टाकलेल्या पायऱ्या रस्त्यापासून बाहेर निघून पाण्याने वाहून गेल्या. या पाण्याच्या प्रवाहात वरठी मोहगाव रस्त्याचा काही भाग वाहून गेल्यामुळे या रस्त्यावरून रहदारी पुर्णत: बंद झाली होती.