कोरोना संकटात गारपीटीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 05:00 AM2021-05-12T05:00:00+5:302021-05-12T05:00:46+5:30

एप्रिल महिन्यापासून कोरोना संकट घोंघावत आहे. संचारबंदीमुळे घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. शेतकरी शेतीकामात व्यस्त झाले आहेत. अशातच गत पाच दिवसांपासून जिल्ह्यात नैसर्गिक प्रकोप सुरू झाला आहे. वादळ, पाऊस आणि गारांचा वर्षाव होत आहे. दररोज सायंकाळी वादळासह पाऊस कोसळत आहे.

Hail strikes in Corona crisis | कोरोना संकटात गारपीटीचा तडाखा

कोरोना संकटात गारपीटीचा तडाखा

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : भंडारा, लाखनी, साकोली, मोहाडीत शेतीसह घरांचे मोठे नुकसान

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संकटाने भयभीत असलेल्या नागरिकांना आता निसर्गाच्या रौद्ररूपाचा सामना करावा लागत आहे. गत पाच दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळत असून सोमवारी रात्री जिल्ह्यात वादळी पावसासह गारांचा वर्षाव झाला. आवळा आणि निंबाच्या आकाराच्या गारा कोसळल्याने धानपिकासह भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले. भंडारा, लाखनी, साकोली, मोहाडी तालुक्यात सायंकाळी ठिकठिकाणी गारांचा खच पडला होता. 
एप्रिल महिन्यापासून कोरोना संकट घोंघावत आहे. संचारबंदीमुळे घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. शेतकरी शेतीकामात व्यस्त झाले आहेत. अशातच गत पाच दिवसांपासून जिल्ह्यात नैसर्गिक प्रकोप सुरू झाला आहे. वादळ, पाऊस आणि गारांचा वर्षाव होत आहे. दररोज सायंकाळी वादळासह पाऊस कोसळत आहे. सोमवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास भंडारा तालुक्यातील शहापूर, कोरंभी, गोपेवाडा, सातोना, जवाहरनगर, सालेबर्डी, खोकरला, टवेपार, मोहदुरा, बेला, पिंडकेपार येथे प्रचंड वादळासह गारा कोसळल्या. आवळा आणि लिंबूच्या आकाराच्या गारा कोसळल्याची माहिती आहे. काही ठिकाणी संत्राच्या आकाराची गार कोसळल्याचे सांगण्यात आले. गावांमध्ये गारांचा खच पडला होता. तब्बल अर्धा तास झालेल्या गारपीटीने उन्हाळी हंगामातील धान उद्ध्वस्त झाला. 
लाखनी तालुक्यालाही गारपिटीचा तडाखा बसला. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या धानपिकाच्या लोंब्यातील दाणे जमिनीवर झडले. निसर्गाच्या दुष्टचक्राचा पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. जेवनाळा, घोडेझरी, मांगली, मचारणा, पालांदूर, कन्हाळगाव आदी गावांना गारपिटीचा तडाखा बसला. अनेक घरांचे नुकसान झाले. साकोली तालुक्यालाही वादळी पावसासह गारांचा तडाखा बसला असून अनेकांचा धान शेतात आडवा झाल्याचे चित्र आहे. तुमसर आणि मोहाडी तालुक्यात मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.  कोरोना संकटापाठोपाठ शेतकऱ्यांना आता नैसर्गिक संकटाचाही सामना करावा लागत आहे. शासनाने तात्काळ नुकसानभरपाई देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
 

जमिनीवर पडला धान ओंब्यांचा सडा
 पवनारा : सतत पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. तुमसर तालुक्यातील बघेडा परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने आणि गारपीटीने उन्हाळी धानपिकांची नासाडी झाली. धान कापणीला आला असताना धानाच्या ओंब्या तुटून पडत आहेत. जमिनीवर धान अंथरून ठेवल्यासारखे दिसत आहे. कडपा पाण्याखाली आला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून बघेडा आणि पवनारा परिसरातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. 

लाखनी तालुक्यात अनेक घरांवरील छप्पर उडाले
- लाखनी : तालुक्यात दोन दिवस झालेल्या वादळी पाऊस आणि गारपीटीने प्रचंड नुकसान झाले. अनेक घरांवरील छप्पर उडून गेले. परिपक्व झालेल्या धानाच्या लोंब्या गळून पडल्या आहेत. तालुका कृषी कार्यालयामार्फत नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. तालुक्यातील केसलवाडा (वाघ), गराडा येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पळसगाव येथील ज्ञानेश्वर चेटुले यांच्या घरावरील छप्पर उडाले. गोंडेगाव येथील विलास बांते, गुरठा येथील मंदार कावळे यांच्या घराचे छप्पर उडाले असून मुरमाडी येथील एका उपहारगृहाचे टीनपत्रे उडून गेले. 

१०० वर्ष जुने आंब्याचे झाड कोसळले
- जवाहरनगर : भंडारा तालुक्यातील ठाणा पेट्रोलपंप येथील विवेकानंद काॅलनीतील १०० वर्ष जुने आंब्याचे झाड सोमवारी रात्री झालेल्या वादळात उन्मळुन पडले. त्यामुळे काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती. झाड वीज तारांवर पडल्याने वीज पुरवठाही खंडीत झाला होता. शहापूर येथील अरुण कारेमोरे यांच्या निहारवानी भागातील शेतातील सोलर पंप गारपीटीने फुटले. त्यात मोठे नुकसान झाले. 

पंचनामे करून नुकसानभरपाई द्या -फुके
- जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे तत्काळ सर्वेक्षण करून पंचनामे करावे आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आमदार परिणय फुके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनाही या निवदेनाची प्रत पाठविण्यात आली आहे. 

गारपिटग्रस्तांचे तत्काळ पंचनामे करा -वाढई
- जिल्ह्यात गत पाच-सहा दिवसांपासून वादळी पावसांसह गारांचा वर्षाव झाला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच कोरोनाने शेतकरी अडचणीत आले आहेत. अशा स्थितीत प्रशासनाने अद्यापही नुकसानीचे पंचनामे केले नाहीत. शासनाने तत्काळ पंचनामे करून लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेना आंदोलन करेल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. रवी वाढई यांनी दिला आहे.

 

Web Title: Hail strikes in Corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस