लाखांदूर तालुक्यात गारपीट
By Admin | Updated: March 17, 2016 00:39 IST2016-03-17T00:39:01+5:302016-03-17T00:39:01+5:30
मंगळवारला सायंकाळी अचानक सुरु झालेल्या वादळ, पाऊस व गारपिटीने चप्राड, मेंढा, सोनी, चिचगाव, इंदोरा या गावांना चांगलेच झोडपले.

लाखांदूर तालुक्यात गारपीट
नुकसानभरपाईची मागणी : शेतपिकासह जनावरे, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
लाखांदूर : मंगळवारला सायंकाळी अचानक सुरु झालेल्या वादळ, पाऊस व गारपिटीने चप्राड, मेंढा, सोनी, चिचगाव, इंदोरा या गावांना चांगलेच झोडपले. शेतपिकासह जनावरे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारांचा थर रस्ते व घरासमोर साचल्याने काहींनी आनंद लुटला तर नुकसानग्रस्त मात्र चिंताग्रस्त दिसले.
उन्हाळ्याच्या दिवसात अचानक पावसाला सुरुवात झाली की अनेकांच्या मनात धडकी भरते आणि काल सायंकाळी नेमके तेच झाले. मागील दोन वर्षापूर्वी तालुक्यातील दिघोरी येथील गारपिटीने भयावह दृष्य आठवू लागले. अचानक सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला जोरदार सुरुवात झाली.
बघता बघता गारपीटीला सुरुवात झाली. गारपीट मोठ्या प्रमाणावर होणार नाही हा नागरिकांचा अंदाज काही मिनिटात खोटा ठरला. संपूर्ण रस्ते, घरासमोरील खुली जागा, नाल्या बर्फाने झाकल्या गेल्या. गारीचा आकार मोठा असल्याने अनेकजण घरातच दडी मारून होते तर काहींनी पानटपऱ्यांचा आसरा घेतला. घरावरचे कवेलू, टीन उडाले, पानटपऱ्या, झोपड्या हवेत उडाल्या. जनावरांच्या अंगावर गारपिटीचा तडाखा बसत असतानासुद्धा पर्याय नसल्याने जखमी झाल्याशिवाय पर्याय उरला नव्हता.
संपूर्ण गाव बर्फमय झाले होते. अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सध्या शेतात असलेले गहू, मका, चना, पपई , वळांचे मोठ्या प्रमाणावर यावेळी नुकसान झाले. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत नाल्यामध्ये, रस्त्यांवर गारांचा खच जमा होता. काहींनी गारांचा मनमुराद आनंद लुटला तर नुकसानग्रस्त डोक्यावर हात ठेवून चिंतेत बसले दिसले. चप्राड, मेंढा, सोनी, चिचगाव, इंदोरा या गावांना भेट देऊन जि.प. सदस्य रमेश डोंगरे यांनी नुकसानीची पाहणी केली. (तालुका प्रतिनिधी)