जिल्ह्याला दिशा देण्याचे काम गर्रा बघेडा करेल

By Admin | Updated: November 18, 2014 22:49 IST2014-11-18T22:49:52+5:302014-11-18T22:49:52+5:30

गावातील प्रयोगशिल शेतकऱ्यांनी शेतीमालाच्या मार्केटिंगचे जे तंत्र अवलंबिले ते जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना जमले नाही हीच या गावाची शक्ती आहे. म्हणूनच संपूर्ण जिल्ह्याला दिशा देण्याचे काम गर्रा

Guidelines will be given to guide the district | जिल्ह्याला दिशा देण्याचे काम गर्रा बघेडा करेल

जिल्ह्याला दिशा देण्याचे काम गर्रा बघेडा करेल

पाहणी : सांसद आदर्श ग्राम योजनेची अंमलबजावणी, नाना पटोले यांचे प्रतिपादन
भंडारा : गावातील प्रयोगशिल शेतकऱ्यांनी शेतीमालाच्या मार्केटिंगचे जे तंत्र अवलंबिले ते जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना जमले नाही हीच या गावाची शक्ती आहे. म्हणूनच संपूर्ण जिल्ह्याला दिशा देण्याचे काम गर्रा बघेडा करु शकते. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा करण्याच्या माझ्या स्वप्नाला वास्तविकतेमध्ये आणण्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले.
सांसद आदर्श ग्राम योजनेमध्ये निवडलेल् या गर्रा बघेडा या गावी नानाभाऊ पटोले यांनी गावात योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना खा.पटोले बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी, आमदार चरण वाघमारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रमेश पारधी, जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, सरपंच वसंतराव तरटे व सर्व प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.खा.पटोले म्हणाले, आदर्श गावाची सुरुवात गावाच्या एकोप्यापासून व्हायला पाहिजे. मतभेदाचे सर्व विचार बाजूला ठेवून गावातील जनता काम करण्यासाठी एकत्र येवू आणि गर्रा बघेडा हे महाराष्ट्रासाठी रोल लमॉडेल करू. गावात चकचकीत रस्ते किंवा समाज मंदिर असल्याने गावाचा विकास झाला असे होत नाही.
गरीबांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना चांगले जीवनमान जगण्यासाठी वातावरण निर्मिती करणे हे आदर्श ग्राममध्ये अपेक्षित आहे.
यासाठी गावातील सर्व लोकांचे सहकार्य अपेक्षित आहे.यावेळी आमदार चरण वाघमारे म्हणाले, आदर्श गावातील लोकांना श्रम करावे लागणार आहे. सगळ्या योजनांची अंमलबजावणी गावात करून घेण्यासाठी गावातीलच लोकांनाच पुढाकार घेवून प्रयत्न करावयाचा आहे. तुमच्या प्रयत्नांनी हे गाव महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील आदर्श ग्राम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे म्हणाल्या, लोकसहभागातूनच आदर्श ग्राम योजनेची अंमलबजावणी यशस्वी होईल. गावातील आर्थिक व सामाजिक दृष्ट्या उपेक्षित राहिलेल्या लोकांपर्यंत गावातील संसाधने पोहचविण्याची जबाबदारी गावकऱ्यांची आहे. गावात एकही गुन्हा घडणार नाही. महिला सभा, बाल सभा, ग्राम सभा वेळेत घेतल्या जाऊन त्यामध्ये गावाच्या हिताचे नियोजन गावकऱ्यांनी करावयाचे आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले, सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि प्रशासकीय विभागाचे संपूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी सरपंच वसंतराव तरटे यांनी प्रास्ताविकामध्ये गावाचा लेखाजोखा मांडताना गावातील समस्या सुद्धा विशद केल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी, उपाध्यक्ष रमेश पारधी, जिल्हा परिषद सदस्य हरेंद्र राहांगडाले, सुरेश राहांगडाले, तुमसरचे पचायत समितीचे सभापती कलाम शेख यांची समयोचित भाषणे झाली. गावात प्रवेश करताच मान्यवरांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि गावातील नागरिक, महिला, विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Guidelines will be given to guide the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.