पालकमंत्री बदलणार!
By Admin | Updated: December 28, 2016 02:00 IST2016-12-28T02:00:37+5:302016-12-28T02:00:37+5:30
नगर पालिका निवडणुकीत असहकार्याची वागणूक दिल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील हजारो शिवसैनिकांनी पक्षप्रमुख

पालकमंत्री बदलणार!
पक्षप्रमुखांनी दिले बदलाचे संकेत : खोतकर किंवा पाटील होणार पालकमंत्री
भंडारा : नगर पालिका निवडणुकीत असहकार्याची वागणूक दिल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील हजारो शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सामूहिक राजीनामे दिले होते. त्यानंतर २३ डिसेंबर रोजी त्यांची मातोश्रीत भेट घेऊन पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्याविरोधात तक्रार केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री बदलण्यात येईल, तुम्ही पक्ष संघटन वाढविण्याचे काम करा, पुन्हा कोणती अडचण आली तर सांगा असे शिवसैनिकांना सांगितले.
भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री अर्जुन खोतकर किंवा गुलाबराव पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता सूत्राने दिली. याशिवाय भंडारा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख खासदार कृपाल तुमाने यांच्याऐवजी नवीन संपर्कप्रमुख देण्यात येणार असल्याचेही सूत्राने सांगितले.
नवीन पालकमंत्री बदलाची प्रक्रिया नववर्षातील पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे यावर्षी २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी पोलीस मुख्यालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण नवीन पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याचे सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)