वृक्षतोडीच्या घटनांमध्ये वाढ
By Admin | Updated: March 14, 2016 00:26 IST2016-03-14T00:26:31+5:302016-03-14T00:26:31+5:30
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती हे संत तुकारामांचे शब्द वृक्षतोडीने नि:शब्द बनून पक्ष्यांची स्वरे दुर्मिळ होत आहेत.

वृक्षतोडीच्या घटनांमध्ये वाढ
वनविभाग सुस्त, तस्कर मस्त
पर्यावरणासाठी धोक्याची घंटा
भंडारा : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती हे संत तुकारामांचे शब्द वृक्षतोडीने नि:शब्द बनून पक्ष्यांची स्वरे दुर्मिळ होत आहेत. वृक्षांमुळे पर्यावरण शुद्ध गंधीत राहून पक्षी सुस्वरात आळवितात. वृक्षतोडीने किती थकलेल्या प्राण्यांचा विसावा हरपणार. हे अनभिज्ञ असलेल्या व पैशाच्या मोहात संतांच्या शिकवणीचा बाजार मांडलेल्या, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत वृक्षांची कत्तल ही बदलत्या पर्यावरणात धोक्याची घंटी आहे.
पूर्वी गावाशेजारी घनदाट अरण्य व आमराई तथा मोठे बाभूळबन असायचे. क्वचित सागवन, बेहडा, हिरडा, आवळा यासारख्या वनस्पती औषधी गुणांसोबतच बहारदार सुगंधाने पर्यावरणाचा समतोल राखत असत. गावाशेजारी अरण्यात फिरणारे पशू पक्षी सुद्धा डोलात विहारत असत. रस्त्याने जातांना उन्हात तहान भूक लागली तरी आमराईची सावली विसावा देवून तहानभूक हरवून जायची.
‘शुष्क काष्ठ तिष्ठत्येग्रे’ या संस्कृत म्हणीप्रमाणे वाळलेले झाड सुद्धा सुशोभीत असते. पण हवा, माती, पाणी राहिले पण झाडांची कत्तल सुरू झाली. बिजे पणजोबांनी पुरीले, फळे चालखे नातवंडांनी, पुण्याई गुरुंची शिष्य सानीयानी फखले. घनदाट आमराईने श्रृंगारलेले गाव वृक्षतोडीने वाळवंटासारखे दिसत आहेत.
गावात तथा रस्त्याच्या कडेला वृक्ष लावा वृक्ष जगवा म्हणून दरवर्षी शासन कोट्यवधी रुपये खर्चून जोगवा मागतो. योजना अंमलात आली की झाडे जगतच नाही. होते काय तर मंत्र्यांपासून गावच्या संत्र्यांपर्यंत ‘मामला फायनल’ केला जातो. वडिलोपार्जीत फळांचे, औषधीगुणांचे झाड तोडू नका ते तोडल्यास मोठ्या कार्यवाहीला समोर जावे लागेल असा कायदा आहे किंवा नाही व कायदा आहे तर कारवाई वनविभाग का करीत नाही.
तलाठी शासकीय व रस्त्यालगतची झाडे तोडण्याचा सात बारा कसा देतो, असेअनेक प्रश्न भ्रष्ट नितीने अनुत्तरीत आहेत. झाडे लावा झाडे जगवा अशा प्रभात फेऱ्या शाळकरी मुलं सुद्धा गावातून काढतात. या अनभिन्न मुलांना सुद्धा बदलत्या पर्यावरणाचा धोका आहे. हे संदेश देणारी मुलंही रस्त्यावरील गावाशेजारील व शेताशिवारातील झाडं विकणाऱ्या किंवा कुऱ्हाडीने कत्तल करणाऱ्या कंत्राटदारांचीच असतील. पण पैशासाठी वाट्टेल ते करायला कुणीही मागे पुढे पाहत नाही.
रस्त्यातून उन्हात जाणाऱ्या पादचाऱ्यांना तहान भुकेने व्याकुळ झाल्यानंतर झाडांच्या सावलीचा विसावा हवा असतो. वानरांना अन्नासोबत कड्या मारायला झाड हवे असते. पक्षांना किलबिलासाठी तथा पृथ्वीवरील संपूर्ण प्राण्यांना पर्यावरणासाठी झाड हवे असते ते झाडच तोडले तर पर्यावरणाचा समतोल राहील का? याचा विचार करूनच झाड तोडणे गरजेचे बनले आहे. (प्रतिनिधी)