वृक्ष कटाई व वन्यप्राणी शिकारीच्या घटनांत वाढ

By Admin | Updated: September 2, 2014 23:29 IST2014-09-02T23:29:56+5:302014-09-02T23:29:56+5:30

वनपाल व वनरक्षकांचा मागील नऊ दिवसांपासून संप सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने त्रिसदस्यीय कमिटीची स्थापना केली आहे. संपादरम्यान जिल्ह्यातील काही वनपरिक्षेत्रात वृक्ष

Growth of tree cutting and wildfire hunting events | वृक्ष कटाई व वन्यप्राणी शिकारीच्या घटनांत वाढ

वृक्ष कटाई व वन्यप्राणी शिकारीच्या घटनांत वाढ

भंडारा : वनपाल व वनरक्षकांचा मागील नऊ दिवसांपासून संप सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने त्रिसदस्यीय कमिटीची स्थापना केली आहे. संपादरम्यान जिल्ह्यातील काही वनपरिक्षेत्रात वृक्ष कटाई जोमात सुरू असून वन्यप्राण्यांच्या शिकारींचेही प्रमाण वाढले आहे. या संपाचा लाकूड वाहतुकीच्या परवान्यासाठी अडसर निर्माण झाला आहे. मध्यप्रदेशातील शिकारी टोळी या संपाचा फायदा घेण्याच्या उद्देशाने चांदपूर परिसरात दाखल झाल्याचे समजते.
संपामुळे वनकर्मचारी कर्तव्यावर नाहीत. त्यामुळे याचा फायदा उचलून अवैध वृक्ष कटाई व वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील रावणवाडी, पिटेझरी, उमरझरी, नाकाडोंगरी, लेंडेझरी, चिखली, पिटेसूर व चांदपूर या वनक्षेत्रात शिकारी व वृक्षकटाई करणाऱ्यांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. नाकाडोंगरी व चिचोली परिसरात फासेपारध्यांनी वन्यप्राण्यांची शिकार केल्या आहेत.
या शिकाऱ्यांनी हरीण, चितळ, सांबर, ससा, मोर व अन्य प्राण्यांच्या शिकारी केल्याचे समजते. या प्राण्यांचे मांस खाण्याला चविष्ट असल्याने त्याची मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. वनकर्मचारी संपावर असल्याने आता शिकाऱ्यांच्या मनात कुठलीही भीती राहली नसल्याने शिकार होत आहे. वनकर्मचारी संपात सहभागी असल्याने कारवाई किंवा त्याची साधी दखलही कोणी घेणारे अधिकारी वनविभागाकडे नाहीत. त्यामुळे या शिकाऱ्यांचे फावत आहे.
तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चांदपूरचे क्षेत्र सुमारे ३ हजार हेक्टरात विस्तीर्ण आहे. हे क्षेत्र घनदाट जंगलाने व्याप्त असल्याने ते अतिसंवेदनशिल क्षेत्र म्हणून ओळखले जाते. संपाचा फायदा घेऊन मध्यप्रदेशातील काही शिकारी टोळी चांदपूर जंगलात दाखल झाले आहे.
मात्र परिसरातील नागरिक व वनमजुरांच्या नजरेस पडल्याने शिकाऱ्यांनी जागा बदलवून दुसरीकडे आपले ठाण मांडले आहे. संपादरम्यान मोठी शिकार करण्याच्या उद्देशाने ही टोळी चांदपूर क्षेत्रात दबा धरून बसल्याचे संपावरील वनकर्मचाऱ्याने लोकमतला सांगितले.
लाकूड वाहतुकीसाठी आवश्यक असलेला वाहतुक परवाना देणारे अधिकारी संपात सहभागी असल्याने अनेक शेतकरी, खासगी कटाईदार व ठेकेदारांकडील कटाई केलेले वृक्ष पडून आहे. पावसाचे दिवस असल्याने याचा विपरीत परिणाम वाहतुकीवर होणार आहे.
अनेक ठिकाणावरून लाकडांची बिना टिपीने वाहतुक केली जात आहे. नाक्यांवरील कर्मचाऱ्यांना वाहन तपासणीचा अधिकार नसल्याने सध्या अवैध वाहतुक राजरोसपणे सुरू आहे. जिल्ह्यात ५७ आरामशिन आहेत. या आरामशिनवर काही परवानाधारक लाकूड कटाईसाठी येत आहे. तर काही लाकूड बिना परवानगीचा कटाई केल्या जात असल्याचेही समजते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Growth of tree cutting and wildfire hunting events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.