ऊसाचे चुकारे अडले
By Admin | Updated: August 7, 2015 00:45 IST2015-08-07T00:45:27+5:302015-08-07T00:45:27+5:30
तालुक्यातील कोष्टी, बाम्हणी, उमरवाडा येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस दि वैनगंगा साखर कारखाना यांनी जानेवारीच्या सुरुवातीलाच खरेदी केला.

ऊसाचे चुकारे अडले
सात महिन्यांपासूनची ओरड : शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर
तुमसर : तालुक्यातील कोष्टी, बाम्हणी, उमरवाडा येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस दि वैनगंगा साखर कारखाना यांनी जानेवारीच्या सुरुवातीलाच खरेदी केला. मात्र सात महिन्याचा कालावधी लोटूनही अद्यापही उसाचे चुकारे न मिळाल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे.
तालुक्यात शेतकऱ्यांना वरदान ठरणारा वैनगंगा साखर कारखान्याची खरेदी करून साखर कारखान्याला नवसंजीवनी दिली. मात्र शेतकऱ्यांचे चुकारे सतत अडतच असल्याने कारखाना शाप की वरदान असेच म्हणण्याची वेळ आता तालुक्यातील शेतकऱ्यांवर आलेली आहे.
जानेवारी २०१५ पासून तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस वैनगंगा साखर कारखान्यामार्फत तोडल्या जावून तो कारखान्यात पोहचता करण्यात आला. परंतु त्याचे चुकारे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही. आधीच दुष्काळाचे सावट असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढविले आहे. त्यामुळे पैशाची उभारणी करणार कुठून या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
आधीच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोसायटी तसेच सावकारांकडून पैशाची उचल केली असून व्याजरुपी कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांवर दिवसेंदिवस वाढतच असताना शेतात रोवणी कशी करायची? हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
साखर कारखान्याचे अध्यक्ष दादा टिचकुले यांच्याशी काही शेतकऱ्यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता आठ दिवसात चुकारे मिळतील, असे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले. मात्र तीन महिन्यांचा कालावधी लोटून गेला तरी अद्यापही चुकारे न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
उमरवाडा येथील ऊस उत्पादक शेतकरी गणेश बनकर यांनी शेतात ऊसाची लागवड केली असता रानडुकरांच्या हैदोसामुळे संपूर्ण ऊसाच्या शेतीचे नुकसान झाले असताना त्या शेतकऱ्याने शेतीत उरलेला ऊस वैनगंगा साखर कारखान्याला १ लक्ष ३५ हजार रुपयांमध्ये विकला. मात्र आजपावेतो चुकारा न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे चुकारे अडलेल्या शेतकऱ्यांवर ओढविल्याने ऊस उत्पादक शेतकरी, गणेश बनकर, कारू किरणापुरे, अंबादास कावळे, नारायण गिरडकर, अनमोल गिरडकर, गोविंद हजारे, बाळकृष्ण किरणापुरे, प्रकाश हजारे, लक्ष्मण बनकर, भाऊराव खरवडे, ईश्वर सोनवानेसह आदी शेतकऱ्यांनी व्यवस्थापक व अध्यक्षांना निवेदन देवून चुकारे मिळण्याची मागणी केली. (शहर प्रतिनिधी)