सिहोरा परिसरात हरियाली योजना गुंडाळली
By Admin | Updated: November 10, 2014 22:37 IST2014-11-10T22:37:48+5:302014-11-10T22:37:48+5:30
बंधारे बांधकाम आणि शेतीविषयक विकासात्मक धोरण राबविण्यासाठी शासनस्तरावर सिहोरा परिसरातील गावात पाणलोट योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वीची हरियाली योजना बंद करुन

सिहोरा परिसरात हरियाली योजना गुंडाळली
चुल्हाड (सिहोरा) : बंधारे बांधकाम आणि शेतीविषयक विकासात्मक धोरण राबविण्यासाठी शासनस्तरावर सिहोरा परिसरातील गावात पाणलोट योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वीची हरियाली योजना बंद करुन या परिसराचा विकास पाणलोट विकास कार्यक्रमातंर्गत करण्यात येणार आहे.
तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातील गावे वैनगंगा आणि बावनथडी नद्यांच्या खोऱ्यात आहेत. याशिवाय सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प मानाचा तुरा रोवत आहे. यामुळे उपजावू शेतीला महत्व आलेले आहे. यामुळे शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शासनस्तरावर पाणलोट योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सिहोरा मंडळ कृषी कार्यालय अंतर्गत ७३ गावापैकी २९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. पाणलोट योजनेत तामसवाडी, रेंगेपार, पांजरा, परसवाडा, वाहनी, मांडवी, पिपरी चुन्ही, वांगी, टेमणी, मांगली, मोहाडी खापा, खापा मोहाडी, गोंदेखारी, चुल्हाड, सुकळी नकुल, गोंडीटोला, देवरी देव, देवसर्रा, महालगाव, ब्राह्मणटोला, बिनाखली तथा सामाजिक वनिकरण विभाग संलग्नित योजनेत मोहगाव खदान, रूपेरा, कर्कापूर, हरदोली, सिंदपुरी, सिहोरा, सितेपार, मच्छेरा गावांचा समावेश आहे. या पाणलोट योजनेत शेतकऱ्यांच्या शेतातील लहान धुरे आकाराने मोठे करणे, पडीक जमिन उपजावू तयार करणे, सिमेंट बंधारे, वळन बंधारे, भूमिहिन गावकऱ्यांना आर्थिक मदत, बचतगटांना निधी, शेततळे तथा अन्य विाकसाची कामे केली जाणार आहेत.
गावात ग्रामसेवक पाणलोट समितीची निवड करण्यात आलेली आहे. या योजनेचा सन २०१३-१४ ते २००१७-१८ असा कालावधी आहे. २६ जानेवारी २०१४ च्या ग्रामसभेत गावा गावात समित्या गठित करण्यात आलेल्या आहे. खापा गाव रिठी असताना या गावातील शेती योजनेत समाविष्ठ करण्यात आली आहे. या शेतीत विकास कामावर नियंत्रण मोहाडी खापा गावातील पाणलोट समिती ठेवणार आहे. दरम्यान पाणलोट समिती निवड प्रक्रियेला १० महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला असताना गावात विकास कामांचा पत्ता नाही. या समितीचा कालावधी ५ वर्षाचा आहे. कामे न करताच १ वर्ष निघून गेला आहे. विकास कामाचा कृती आराखडा तयार करताना ६ कोटी २६ लाख ८१ हजार रूपयाचा निधी मागणी करणारा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. मात्र गावांच्या विकासाकरीता आॅगस्ट २०१४ या महिन्यात केवळ ३ लाख ४४ हजार रूपये प्राप्त झाले आहे. या निधीतून पाणलोट सचिवाचे महिनाभराचे वेतन, प्रशासकीय खर्च, बैठका, प्रशिक्षण आदीवर खर्च करण्यात आले आहे.
या परिसरात हरियाली योजना सुरू असताना शेततळे तयार करण्यात आले होते. या शेततळ्यात पाणीच नाही या योजनेत लक्षावधीचे वारे न्यारे झाले आहेत. आता ही योजनाच बंद करण्यात आल्याने घबाड इतिहासजमा होणार आहे. (वार्ताहर)