‘हिरव्या कोबी’ने वाचविला शेतकऱ्याचा ‘संसार’

By Admin | Updated: January 9, 2016 00:47 IST2016-01-09T00:47:23+5:302016-01-09T00:47:23+5:30

कर्जबाजारीपणामुळे राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या करीत आहे. डोक्यावर कर्जाचे डोंगर असतानाही हिम्मत न हारता ...

'Green cabbage' saved farmer's 'world' | ‘हिरव्या कोबी’ने वाचविला शेतकऱ्याचा ‘संसार’

‘हिरव्या कोबी’ने वाचविला शेतकऱ्याचा ‘संसार’

दिघोरीचे तरूण शेतकरी रवींद्र उपरीकर यांचा प्रेरणादायी प्रयोग
प्रशांत देसाई भंडारा
कर्जबाजारीपणामुळे राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या करीत आहे. डोक्यावर कर्जाचे डोंगर असतानाही हिम्मत न हारता लाखनी तालुक्यातील दिघोरी (नान्होरी) येथील एका अल्पशिक्षित शेतकऱ्याने परंपरागत फुलकोबीऐवजी नाविन्यप्रयोग करून हिरव्या कोबीचे पीक (ब्रोकोली जातीची) घेतले. यातून त्यांनी कर्जाची परतफेड करून संसार सावरला आहे.
रविंद्र खुशाल उपरीकर असे या नाविन्यप्रयोग करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. लाखनी तालुक्यातील आडमार्गावर वसलेल्या दिघोरी (नान्होरी) येथील अल्पभूधारक व अल्पशिक्षित शेतकऱ्याने ही प्रगतशिल शेती कसली आहे. त्यांचा हा नाविन्यपूर्ण प्रयोग कर्जाच्या ओझ्याखाली दबल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
मागील तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा उपरीकर यांना चांगलाच फटका बसला. यामुळे त्यांच्यावर सुमारे दोन लाखांचे कर्ज झाले. कर्ज फेडण्याऐवजी त्याचा डोंगर वाढत होता. त्यामुळे त्यांचा गोंडस संसार मोडकळीस येण्याची भीती निर्माण झाली होती. अशावेळी त्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत शेतातील एका कोपऱ्यात १० डिसमिल जागेत ‘ब्रोकोली’ जातीच्या हिरव्या रंगाच्या फुलकोबीची लागवड केली. यातून त्यांना ५० हजारांचा नफा मिळाला.
हिरव्या रंगाच्या कोबीची लागवड केल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांना वेड्यात काढले. मात्र, ज्यावेळी कोबीचे उत्पादन निघाले, ते बघण्यासाठी अनेकांनी त्यांचे शेत गाठले. दरम्यान माळी महासंघाच्या वतीने नागपूर येथे आयोजित माळी समाजातील औद्योगिक मेळाव्यात उपरीकर यांच्या कोबीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याने त्यांच्यात हिम्मत निर्माण झाली.
घरची हलाखीची परिस्थिती व कर्जाच्या वाढत्या ओझ्याखाली दबलेल्या रविंद्रने हिम्मत हरली होती. मात्र, नव्या उमेदीने यावर्षी रविंद्रने तीन एकरपैकी दीड एकर शेतीत ‘ब्रोकोली’ची लागवड केली. सेंद्रीय खतांचा वापर करून कोबीचे उत्पादन घेतले आहे. कोबीचे पहिले फुल तोडल्यानंतर त्याच रोपट्याला पुन्हा दोनदा फुुल लागत असून एकाच खर्चात दोनदा उत्पादन घेता येते. यासाठी केवळ एकदाच एकरी ४० हजार रूपयांचा खर्च आला असून यातून पाच ते सात लाख रूपये नफा मिळण्याची अपेक्षा आहे.
रविंद्र यांच्यासोबत त्यांची आई सखुबाई, वडील खुशाल, पत्नी माधवी, मुलगी स्नेहल व मुलगा अभिषेक हे त्यांना सहकार्य करतात. कोबीच्या उत्पन्नातून नव्या उमेदीचे किरण त्यांना दिसू लागले असून कर्जाची परतफेड होईल, अशी आशा रविंद्र यांनी ‘लोकमत’शी बोलतना व्यक्त केली.

आहारातील मुकुटमणी ‘ब्रोकोली’

ब्रोकोली नावाने ओळखले जाणारे हे हिरवे फुलकोबीची लागवड विदेशात होते. या कोबीमुळे कॅन्सरसारख्या आजाराची तीव्रता कमी होते. या कोबीत सूक्ष्म द्रव्ये व जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. त्यामुळे या कोबीला आहारातील मुकुटमणी संबोधण्यात येते.
कृषी विभाग अनभिज्ञ
पारंपरिक शेतीला फाटा देत ‘शेडनेट’अभावी रविंद्रने चांगल्या प्रकारचे उत्पादन घेतले. महानगरात या कोबीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, ग्रामीण भागात शेतकऱ्याची आर्थिक कुचंबना होत आहे. प्रगतीशिल शेत व शेतकऱ्याची कृषी विभागाला माहिती नाही. हीच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरी शोकांतिका आहे.

Web Title: 'Green cabbage' saved farmer's 'world'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.