हरभऱ्याला फुटले कोंब गहू होतोय काळसर
By Admin | Updated: March 18, 2015 00:48 IST2015-03-18T00:48:41+5:302015-03-18T00:48:41+5:30
सलग चार दिवस अधून मधून पडत असलेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील पिकांची चांगली हानी झाली.

हरभऱ्याला फुटले कोंब गहू होतोय काळसर
भंडारा : सलग चार दिवस अधून मधून पडत असलेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील पिकांची चांगली हानी झाली. गहू, हरभरा, तूर यासह भाजी पिकांचीही नासाडी झाली. तालुक्यातील बहुतांश शेतातील हरभऱ्याला कोंब फुटले असून काही शेतातील गहू काळा पडायला सुरूवात झाली.
खरीप हंगामात धान व इतर पिकांची झालेली नासाडी अजूनही शेतकरी विसरले नाहीत. शासनाच्या मदतीच्या नावावर मिळणारी तुटपुंजी रक्कम अजूनही अनेकांपर्यंत पोहोचलेली नाही. महिनाभरापूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पैसे अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत. खरीप हंगाम हातचा गेला रब्बी पिकाकडून आस लावून बसलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा जीव बदलते हवामान पाहून टांगणीला लागत आहे.
तालुका गारपिटीतून बचावला असला तरी ढग मात्र कायम आहेत. रबी पिकाचेही नुकसान करायचे असे जणू निसर्गाने ठरविले असावे. या भितीने शेतकऱ्यांचा जीव कासाविस होत आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी हरभरा व गव्हाची शेती फुरविली. त्यांचे या तीन चार दिवसांच्या अवकाळी पावसाने कंबरडे मोडले. पाऊस अधूनमधून पडत आहे. ज्या शेतकऱ्यांनी हरभरा सोंगून गंज लावले त्यांच्या पदरी आता घुंगऱ्या पडत आहे. गंजी लावलेला हरभरा काळाशार पडत आहे.
गेल्या वर्षी झालेल्या नापिकीची नुकसान भरपाई अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. सर्वेक्षण केले जात आहे. त्यातच घोळावर घोळ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असल्याने कुणाला लाभ तर कुणाला भोपळा, अशी स्थिती गेल्या दोन वर्षात झाल्याने नुकसान भरपाई मागायची कुणाला, अशा मन:स्थितीत शेतकरी आला आहे. (प्रतिनिधी)