भरधाव कारने आजी, नातवाला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2016 00:18 IST2016-05-22T00:18:22+5:302016-05-22T00:18:22+5:30
नेरलाहून चप्राड येथे नातवाला सोडून देण्यासाठी चप्राड बसस्थानकावर रस्ता ओलांडण्याच्या प्रतीक्षेत असताना एका मद्यपी वाहन चालकाने त्या दोघांनाही चिरडले.

भरधाव कारने आजी, नातवाला चिरडले
चप्राड बसस्थानकावरची घटना : संतप्त जमावाने चालकाला बदडले
लाखांदूर : नेरलाहून चप्राड येथे नातवाला सोडून देण्यासाठी चप्राड बसस्थानकावर रस्ता ओलांडण्याच्या प्रतीक्षेत असताना एका मद्यपी वाहन चालकाने त्या दोघांनाही चिरडले. ही घटना शनिवारला दुपारी ४ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील चप्राड बसस्थानकावर घडली.
मिलाबाई कोटराम नान्हे (४५) रा.नेरला ता.पवनी व कमलेश सहादेव दिघोरे (४) रा.चप्राड असे मृत आजी नातवाचे नाव आहे. कमलेश हा नेरला येथे आजीकडे पाहुणा म्हणून गेला होता. शनिवारला दुपारी नातवाला सोडून देण्यासाठी बसमधून चप्राड बसस्थानकावर उतरली. रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने ती रस्त्याच्या कडेला नातवासोबत थांबली होती. दरम्यान लाखांदूरकडून वडसाकडे जाणाऱ्या एका भरधाव चारचाकी वाहनाने दोघांनाही चिरडले.
अपघातग्रस्त चारचाकी वाहनात चार तरूण बसले होते. वाहनचालक व अन्य तिघे मद्यप्राशन करून होते. चालकाच्या निष्काळजीमुळे अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या अपघातात दोघांच्याही शरीराचा चेंदामेंदा झाला. रस्त्यावर रक्ताचा सडा पसरला होता. अपघातानंतर गावकऱ्यांनी वाहन चालकाला बदडले. दरम्यान अन्य तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देवीदास भोयर हे ताफा घेऊन घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनीधी)