ग्रंथोत्सवातून समाजाला वैचारिक भूमिका मिळावी
By Admin | Updated: February 14, 2016 00:43 IST2016-02-14T00:43:18+5:302016-02-14T00:43:18+5:30
जगण्याला बळ देणारे, संभ्रमावस्थेत दिशा दाखविणारे आणि अशांत मन शांत करणारे साहित्य माणसा-माणसांना जोडत असते.

ग्रंथोत्सवातून समाजाला वैचारिक भूमिका मिळावी
प्रकाश एदलाबादकर : ग्रंथोत्सवाचे थाटात उदघाटन
भंडारा : जगण्याला बळ देणारे, संभ्रमावस्थेत दिशा दाखविणारे आणि अशांत मन शांत करणारे साहित्य माणसा-माणसांना जोडत असते. आज आपल्या प्रवृत्तीमुळे आपण थोर संत आणि समाजसुधारकांची सुध्दा जाती आणि धर्मामध्ये विभागणी केली आहे. या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून समाजाला नवीन दिशा मिळावी. येथील जनतेला वैचारिक भूमिका मिळावी आणि ग्रंथातून जीवनाचे तत्त्वज्ञान समजावे, यासाठी ग्रंथालयाचा धांडोळा घेऊन त्यातील ज्ञान आत्मसात करायला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक व साहित्यिक प्रकाश एदलाबादकर यांनी केले.
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालय संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा ग्रंथोत्सव २०१५ चे आयोजन नगर परिषद महात्मा गांधी विद्यालय येथे करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते. या निमित्ताने १३, १४ आणि १५ फेब्रुवारी या तीन दिवसीय ग्रंथोत्सवादरम्यान ग्रंथ प्रदर्शन व विक्री यासोबत विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी राहणार आहे.
यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम यांच्याहस्ते पुस्तकांच्या स्टॉल व ग्रंथोत्सवाचे उदघाटन झाले. प्रसंगी प्रा.विनोद मेश्राम, नीळकंठ रणदिवे, वामन तुरिले, जयश्री सातोकर, सत्तार खान, मुख्याध्यापक बी. जी. वाघाये, हर्षल मेश्राम, निरंजन शिवणकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे उपस्थित होते.
यावेळी एदलाबादकर म्हणाले, नवीन पिढीमध्ये भाषेच्या ज्ञानासोबत वाचनाची आवडही कमी होत आहे. या पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आतिशय आवश्यक आहे. संस्कृतीपासून दुरावणारी माणसे जोडायाची असतील तर ग्रंथासारखा दुसरा मित्र नाही. वाचनाने बुध्दी समृध्द होते. पुस्तकात माणसांच्या विचाराची दिशा बदलविण्याची शक्ती आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज यांच्या कवितांचा आधार घेत एदलाबादकर यांनी आजच्या बदलत्या परिस्थितीवर परखड भाष्य केले.
अमित मेश्राम म्हणाले, शासकीय अधिकाऱ्यांचा आणि वाचनाचा संबंध केवळ शासन निर्णयापुरता राहिला आहे. आजच्या ‘टेक्नोसॅव्ही’ पिढीचा विचार करता ई- बुक्स, ई-साहित्य निर्मितीची गरज आहे. ग्रथांलयांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन ई- ग्रंथालय निर्मितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले. प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी ग्रंथोत्सवाविषयी माहिती दिली. आभारप्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांनी केले. सकाळी गांधी विद्यालयातून ग्रंथदिडी निघाली. समाजकल्याण सहाय्यक आयुक्त देवसुदन धारगावे यांनी ग्रंथाचे पूजन करुन ग्रंथ दिंडी मार्गस्थ केली. यावेळी महात्मा गांधी विद्यालय व भागिरथा भास्कर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत लेझिम नृत्य सादर केले. (नगर प्रतिनिधी)