ग्रामसेवकांचा मोर्चा
By Admin | Updated: July 1, 2014 01:18 IST2014-07-01T01:18:44+5:302014-07-01T01:18:44+5:30
ग्रामसेवकांच्या मागण्यासंदर्भात शासनाकडून आश्वासनाची पूर्तता केली जात नसल्यामुळे महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

ग्रामसेवकांचा मोर्चा
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : ११ जुलैपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा
भंडारा : ग्रामसेवकांच्या मागण्यासंदर्भात शासनाकडून आश्वासनाची पूर्तता केली जात नसल्यामुळे महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांची पूर्तता न झाल्यास दि.११ जुलैपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद चौकातून मोर्च्याला प्रारंभ झाला. या मोर्च्यात शेकडो ग्रामसेवक सहभागी झाले होते. मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथे मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले. सभेला संघटनचे राज्य सरचिटणीस अतुल वर्मा, जिल्हाध्यक्ष शिवपाल भाजीपाले, प्रमोद तिडके, राजू महंत, श्याम बिलवणे, विलास खोब्रागडे आदींनी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची अंमलबजावणी ग्रामसेवकांनी केली. परंतु ग्रामसेवकांचे प्रश्न शासन दरबारी वारंवार मांडूनही सुटले नाही. सहनशिलतेचा अंत झाला आहे. ग्रामसेवक गावात ग्रामसभा घेतो, वार्षिक सभा घेतो, दुष्काळ पडल्याच्यानंतर अतिशय प्रभाविपणे काम करीत असतो.
ग्रामपंचायती आॅनलॉईन करणे, ग्रामपंचायतींची दैनंदिन कामे शासनाच्या योजना गावापर्यंत पोहचविणे आदी विविध अभियानात ग्रामसेवकांनी नाविन्यपुर्ण कामे केली आहेत. परंतु ग्रामसेवकांचे प्रश्न सुटत नाही. उलट कामाचा ताण आणि व्याप वाढला आहे.
शासनाने आतातरी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची वेतनतृटी दुर करावी, ग्रामपंचायत स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ कंत्राटी शिक्षकाप्रमाणे सेवेत लागलेल्या तारखेपासून धरावे, २० ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करावे, प्रवास भत्ता वेतनासोबत तीन हजार रूपये करण्यात यावे आदी मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा दि.११ जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.
शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले मागण्यांचे निवेदन सोपविले. मोर्च्यात शिवपाल भाजीपाले, प्रमोद तिडके, राजू महंत, श्याम बिलवणे, विवेक भरणे, पी.आर. भुयार, एन.एस. घोडीचोर, जे.एम. वेदी, अनिल धमगाये, एम.एस. शेंडे, अशोक ब्राम्हणकर, प्रदीप लांजेवार, एन.सी. बिसेन, अमित चुटे, एन.एच. जिरितकर, गोकुळा सानप, वाय.डी. उपरीकर, मंगला डहारे, विलास खोब्रागडे यांच्यासह शेकडो ग्रामसेवक सहभागी झाले. (नगर प्रतिनिधी)