ग्रामसेवकांचे आंदोलन चिघळले
By Admin | Updated: July 9, 2014 23:17 IST2014-07-09T23:17:08+5:302014-07-09T23:17:08+5:30
ग्रामसेवकांनी सुरू केलेल्या काम बंद आंदोलनाला एक आठवडा उलटला असून, ग्रामीण भागातील कामे ठप्प झाल्याने ग्रामसेवकांचे हे आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने

ग्रामसेवकांचे आंदोलन चिघळले
भंडारा : ग्रामसेवकांनी सुरू केलेल्या काम बंद आंदोलनाला एक आठवडा उलटला असून, ग्रामीण भागातील कामे ठप्प झाल्याने ग्रामसेवकांचे हे आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेवून जिल्ह्यातील ग्रामसेवकांना नोटीसेस बजावल्या आहेत. मात्र या नोटीसांनाही न जुमानता ग्रामसेवक मुंबई येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाल्याने वेळप्रसंगी या ग्रामसेवकावर कठोर कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक संघटनेने १ जुलैपासून आंदोलन सुरू केले आहे. पहिल्या दिवशी मोर्चा काढून ग्रामसेवकांनी शक्ती प्रदर्शन केले तर २ जुलै रोजी ग्रामपंचायतीच्या चाब्या व शिक्के गटविकास अधिकारी यांच्याकडे सोपवून कामकाजावर बहिष्कार टाकून ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. तेव्हापासून ग्रामीण भागातील शासन स्तरावरील सर्व कामे ठप्प झाले आहेत. सध्या विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे, शेतकऱ्यांना शेती पेरणीसाठी लागणारे दाखले तर शासकीय स्तरावरील विकास कामांची अंमलबजावणी ठप्प आहे. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामसेवक संघटनेने घेतल्याने याची गंभीर दखल घेत प्रशासनाने ग्रामसेवकांना नोटीसेस बजावल्या आहे. (नगर प्रतिनिधी)