ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन अडले
By Admin | Updated: January 11, 2016 00:29 IST2016-01-11T00:29:00+5:302016-01-11T00:29:00+5:30
ग्रामीण भागात ग्राम पंचायतमध्ये २४ तास सेवा दिले जात असताना कर्मचाऱ्यांना निर्धारीत कालावधीत वेतन दिले जात नाही.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन अडले
२७ लाखांची थकबाकी : कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ
चुल्हाड (सिहोरा) : ग्रामीण भागात ग्राम पंचायतमध्ये २४ तास सेवा दिले जात असताना कर्मचाऱ्यांना निर्धारीत कालावधीत वेतन दिले जात नाही. सिहोरा परिसरासह तुमसर तालुक्यातील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी असल्याने कर्मचाऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
तुमसर तालुक्यात ग्रामपंचायतमध्ये दीडशेहून अधिक कर्मचारी कार्यरत आहे. अल्पशा मानधनावर त्यांचे उदरनिर्वाह सुरु आहे. या कर्मचाऱ्यांची गावात कामे करताना वेळ निश्चित नाही. अतिरिक्त वेळेत कार्य करताना त्यांचे भत्ते दिले जात नाही. गावकऱ्यांचे दाखले व कराची वसुली यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ग्रामसेवकांची अर्धेअधिक प्रशासकीय कामे कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत. गावात आधी कोतवाल हे प्रशासकीय कामकाजात मदत करीत होते. परंतु आता त्यांची जबाबदारी कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर आली आहे. कामाचा भडीमार असताना वेतन मात्र अल्प आहे. शासन तथा ग्रामपंचायत या कर्मचाऱ्यांना वेतन देताना ५०-५० टक्केचा वाटा उचलत आहे. ५० टक्के अनुदान शासन देत असताना महिन्याकाठी ही राशी उपलब्ध करण्यात येत नाही. सहा ते सात महिने अनुदान प्राप्त होत नाही. तुमसर तालुक्यातील अंदाजे २७ लाखांचे देयके अडली आहे. यामुळे २०१५ या वर्षातील दिवाळी अंधारात गेली आहे. आता लग्नसराई डोक्यावर आहे. परंतु घरात छदामही नसल्याने चिंता वाढल्या आहे. वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे कनिष्ठांना सांगण्यात येत आहे. परंतु कायमस्वरुपी तोडगा काढण्यात येत नाही. १३ जानेवारीला कर्मचारी पंचायत समिती आवारात आत्मदहन करणार आहेत. (वार्ताहर)