मृतकांच्या नावाने धान्य वाटप
By Admin | Updated: October 13, 2016 01:01 IST2016-10-13T01:01:41+5:302016-10-13T01:01:41+5:30
अंत्योदय योजनेअंतर्गत मृतकांची नावे असलेल्या राशन कार्डाहून धान्य वितरीत केले जात आहे.

मृतकांच्या नावाने धान्य वाटप
वरिष्ठांना निवेदन : माहितीच्या अधिकारांतर्गत उघड झाली माहिती
भंडारा : अंत्योदय योजनेअंतर्गत मृतकांची नावे असलेल्या राशन कार्डाहून धान्य वितरीत केले जात आहे. ही धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारांतर्गत मागण्यात आलेल्या माहितीच्या अनुषंगाने उघडकीला आली आहे. हा प्रकार मोहाडी तालुक्यातील पालोरा येथे घडला आहे. यासंदर्भात संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
पालोरा येथील स्वस्त धान्य दुकान चालविणाऱ्या शारदा गोमासे यांच्याकडे अंत्योदय योजनेचे ९१ राशन कार्डधारक आहेत. यापैकी अंदाजे गावातील २० लाभार्थी मृत्यू पावलेले तर काही बाहेरगावी आहेत. याबाबतची माहिती माहितीच्या अधिकारांतर्गत उघडकीला आल्यानंतरही संपूर्ण ८६ शिधापत्रिका धारकांचा धान्य पुरवठा सहायक पुरवठा अधिकारी मोहाडी यांच्या मार्फत प्रत्येक महिन्याला करण्यात येत आहे.
याशिवाय दारिद्रयरेषेखालील योजने अंतर्गत डी-१ रजिस्टरप्रमाणे ७८ लाभार्थी आहेत. यातील एक शिधापत्रिकाधारक महिला पेंशनधारक आहे. तसेच एका नागरिकाचा शिधापत्रिकेवर २० युनिट असून ते मृत्यू पावले आहेत. याशिवाय अन्य शिधापत्रिका धारकांपैकी काही बाहेरगावी तर काहींचा मृत्यू झाला आहे. परंतु त्यांचे धान्य आजही तहसील प्रशासनामार्फत संबंधित धान्य दुकानदाराला वितरीत केला जात आहे.
अन्न सुरक्षा योजने अंतर्गतही १० लाभार्थी आहेत. परंतु डी-१ रजिस्टरमध्ये अद्यापही गावाची नोंदणी झालेली नाही.
नत्थू बुरडे या ८० वर्षीय वृद्धाला बीपीएल अंतर्गत लाभार्थी म्हणून नोंद असली तरी त्यांना कोणताच प्रकारचा लाभ मिळालेला नाही. यापूर्वीही झालेल्या दक्षता समितीच्या सभेत शिधापत्रिका धारकांचा रेकॉर्ड व डी-१, विक्री रजिस्टर दाखविण्यात आले. नव्हते तसा अहवालही तलाठी यांनी तहसीलदार मोहाडी यांच्याकडे पाठविला आहे.
अशीच समस्या केरोसीन विक्रीबाबतही आहे. यासंपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देवदास बुरडे यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
कोणत्याही लाभार्थ्यांवर अन्याय होणार नाही व त्यांना नियमित धान्य मिळावे याबाबत सुधारणा सुरू आहे. वर्षभरापुर्वीच्या रेकॉर्डमध्ये काही बोगस नोंदी आढळल्या होत्या. त्यासंदर्भात गरीब व गरजु लोकांना याचा फायदा देण्यात येणार आहे.
-गोकूळाताई सानप,
ग्रामसेवक पालोरा.