गोवारी समाजबांधवांचे स्रेहमिलन उत्साहात
By Admin | Updated: November 14, 2015 00:52 IST2015-11-14T00:52:10+5:302015-11-14T00:52:10+5:30
स्थानिक नवयुवक आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने गोवर्धन पूजा तसेच समाजबांधवांचा स्नेहमीलन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

गोवारी समाजबांधवांचे स्रेहमिलन उत्साहात
गावागावात गोवर्धन पूजा : भाविकांनी घेतला गंगा-जमुना मातेचा आशीर्वाद
बोंडगावदेवी : स्थानिक नवयुवक आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने गोवर्धन पूजा तसेच समाजबांधवांचा स्नेहमीलन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
बलीप्रतिपदेच्या निमित्ताने गोवर्धन पूजेचा कार्यक्रम बाजार चौकात सालाबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा घेण्यात आला. गावातील नवयुवक आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने पहिल्या प्रथमच एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजाचे मार्गदर्शक दे.मो. मानकर, डॉ. श्यामकांत नेवारे, मु.धो. मानकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम भगवान श्रीकृष्ण मंदिरात पूजापाठ, भजन करून काला फोडण्यात आला. नवयुवक आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने सर्व ग्रामस्थांना दिवाळीच्या शुभेच्छा देवून गोवर्धन पूजा व स्रेहमीलन कार्यक्रम घेण्यात आला. संपूर्ण गावातील जनावरे (गोधन) रंगीबेरंगी सजवून गोवर्धन पूजेच्या ठिकाणी आणण्यात आले. श्रद्धास्थान असलेल्या मॉ गंगा-जमुना मातेच्या आशीर्वादाने गावातील अख्ख्या जनावरांची तसेच गोवर्धनाची वयोवृद्ध गुराखी लक्ष्मण शेंदरे यांनी विधिवत पूजाअर्चा केली. रमेश राऊत यांच्या पाऊलच्या तालावर आलेल्या गायीला नैवैद्य जेवन देण्यात आले. मंत्रोपचारांनी गोधन बांधण्यात आले. गोळा केलेल्या गोधनावरून सर्व जनावरांना सोडण्यात आले. गंगा मातेने राख-विळा शिंपून जनावरांना आशीर्वाद दिले.
जुन्या आख्यायिकेनुसार ‘ईळा पिळा टळो आणि बळीचे राज्य येवो’ याची कामना करण्यासाठी उपस्थितांनी गोधनाला नतमस्तक करीत होते. आपली श्रद्धा असल्याचे समजून अनेक महिलांनी लहान बालकांना गोधनावर दंडवत घालण्यासाठी ठेवले. सुख, शांती मिळावी या आशेने चालत आलेल्या परंपरेनुसार गोधनावर बालकांना ठेवत असल्याचे गोवारी समाजाचे ज्येष्ठ विचारवंत सेवानिवृत्त मुख्याध्यापक मु.धो. मानकर यांनी सांगितले. गोधनपूजा पाहण्यासाठी गावासह परिसरातील जनता बहुसंख्येने उपस्थित होती. उपस्थितांनी जमुना मातेचा आशीर्वाद घेतला. गोवारी समाज संघटनेच्या वतीने उपस्थितांना पान-सुपारी वितरित करण्यात आली. (वार्ताहर)