शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनविण्यावर शासनाचा भर
By Admin | Updated: May 29, 2017 00:20 IST2017-05-29T00:20:20+5:302017-05-29T00:20:20+5:30
शेतीच्या क्षेत्रात गुंतवणुकीकडे लक्ष न दिल्यामुळे उत्पादकता कमी झाली.

शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनविण्यावर शासनाचा भर
चरण वाघमारे : पांजरा येथे शेतशिवार संवाद फेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : शेतीच्या क्षेत्रात गुंतवणुकीकडे लक्ष न दिल्यामुळे उत्पादकता कमी झाली. यावर उपाय म्हणून भाजप सरकारने सर्वप्रथम गुंतवणुकीवर भर देऊन अडीच वर्षात ४० हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने ठोस पाऊल उचलले असल्याचे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी दिले.
पांजरा येथील गणेश हिंगे यांच्या शेतात आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शिवार फेरीचे आयोजन केले होते. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मोहाडी पंचायत समितीचे सभापती हरिश्चंद्र बंधाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, उपसभापती विलास गोबाडे, पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे, रवी येळणे, भाजपचे तालुकाध्यक्ष बाबूराव ठवकर, नितीन भाजीपाले, निरंजना साठवणे, श्वेता नारनवरे, चेतन डोंगरे, बोथलीचे उपसरपंच उमेश डाकरे व वंदना बागडे उपस्थित होते.
शेती विकासासासाठी राज्य सरकारने ३१ हजार कोटी खर्च केले. यात जलयुक्त शिवार, सिंचन योजना, अन्नसुरक्षा, शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ यावर खर्च करण्यात आले. अडीच वर्षात शेतकऱ्यांना ११ हजार ०९५ कोटी रुपयांची मदत दिली. ६ हजार ७३९ कोटी रुपये शासनाने पीक विम्यावर खर्च केले.
शेतकरी कर्जमुक्तीने नाही तर आर्थिक सक्षम झाल्यास कर्ज घेण्याची गरज पडणार नाही. यावर उपाययोजना करीत आहे. यासाठी शेतीला मुबलक पाणी, शेतीमालाला भाव आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती आमदार वाघमारे यांनी दिली. संचालन घनश्याम बोंद्रे यांनी तर आभार रवी येळणे यांनी मानले.