महिला सक्षमीकरणासाठी शासन प्रशासन सरसावले
By Admin | Updated: August 9, 2016 00:37 IST2016-08-09T00:37:14+5:302016-08-09T00:37:14+5:30
समाजात महिलांना सन्मान मिळावा. समाजाच्या बदलात महिलांनी समान सहभाग मिळावा....

महिला सक्षमीकरणासाठी शासन प्रशासन सरसावले
लाखनी तालुक्यात जनजागृती कार्यक्रम : महिलांची लक्षणीय उपस्थिती
पालांदूर : समाजात महिलांना सन्मान मिळावा. समाजाच्या बदलात महिलांनी समान सहभाग मिळावा. शासनाच्या विविध योजनात पुरुषांबरोबरीचे हक्क स्त्रियांनाही मिळावे. स्त्रियांचे आर्थिक सामाजिक, राजकीय, धार्मिक शोषण थांबावे,या उदात्त हेतूने लाखनी तालुकाभर महसूल सप्ताहाच्या प्रसंगाने २२ तलाठी साझ्यात कार्यक्रमाची रेलचेल होती. यात बचतगट, विद्यार्थीवर्ग, आरोग्य विभाग, महसूल, महिला बालकल्याण विभाग, पंचायत समिती व तालुक्यातील सर्व विभागाचे प्रमुखांनी सहभाग नोंदवित कार्यक्रम यशस्वी केला.
तालुक्याला स्वप्नदीप सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला. यात आमदार राजेश काशीवार, अप्पर जिल्हाधिकारी प्रदीप डांगे, उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हापुरवठा अधिकारी बेंडे, खनिकर्म आधिकारी नेताम, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिल्लोरकर, पंचायत समिती सभापती रजनी आत्राम, नगरपंचायत अध्यक्षा भिवगडे, तहसिलदार साकोली, लाखांदूर, लाखनीचे राजीव शक्करवार तसेच सर्व विभागाचे तालुका प्रमुख हजर होते.
लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत सातबारा उता-यावर पुरुषांबरोबरच महिलांचा मालकी हक्काची नोंद वारसान नोदंणीत महिलांच्या नावाचा समावेश महिला खातेदारांची अभिलेख विषयाची प्रकरणे निकाली काढणे, रोहयो अंतर्गत महिलांकरिता जॉबकार्ड मार्गदर्शन, शिधापत्रिकेवर कुटूंबप्रमुख म्हणून महिलांची नोंद, १८ वर्षे पुर्ण झालेल्या मुलींची मतदार नोंदणी, शाळा, महाविद्यालयातील मुलींना विविध दाखल्यांचे वितरण व मुलींच्या आत्मरक्षणाकरिता पोलीस विभागाच्यावतीने कराटे प्रशिक्षणाची सोय आदी उपक्रमावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. पालांदूर परिसरात पालांदूर, किटाडी, गुरठा, इसापूर (गोंडेगाव) या तलाठी मुख्यालयात महिला सक्षमीकरण मेळावे पार पडले. याकरिता तलाठी नरेश पडोळे, एस. जी. अकनरवार, दिपा डहाट, आर. जी. देशमुख, मंडळ अधिकारी टिकेश्वर गि-हेपुंजे यांनी सहकार्य केले.
लाखनी येथील मेळाव्यात लाभार्थ्यांना १२ सोलर कंदिल, ३ ताडपत्री, ३ पंपसेट, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्याचे प्रत्येकी २० हजाराचे ३९ लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले. तसेच जेष्ठ नागरिक ओळखपत्र घरकुलचे धनादेश, कुटूंबप्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. प्रास्ताविक तहसिलदार राजीव शक्करवार, आभार ना. तहसिलदार अश्विनी जाधव यांनी केले. कार्यक्रमाकरिता सर्व महसूल कर्मचारी व इतर कर्मचा-यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)