सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले

By Admin | Updated: January 20, 2016 00:50 IST2016-01-20T00:50:29+5:302016-01-20T00:50:29+5:30

आम्ही सरकारमध्ये असताना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पैसेवारी योग्य पध्दतीने काढण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

The government left the farmers on the wind | सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले

सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले

प्रफुल पटेल यांचा आरोप : भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक
भंडारा : आम्ही सरकारमध्ये असताना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पैसेवारी योग्य पध्दतीने काढण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले. आता खरी परिस्थिती लपवून पैसेवारी जास्त दाखविली जात असताना या सरकारने जिल्ह्यातील ९० टक्के शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी केला.
भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आढवा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, नगराध्यक्ष बाबुराव बागडे, जि.प. उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती नरेश डहारे, सभापती शुभांगी राहांगडाले, कल्याणी भुरे, अ‍ॅड.जयंत वैरागडे, अविनाश ब्राम्हणकर, सच्चिदानंद फुलेकर, हाजी सलाम उपस्थित होते.
यावेळी खा.पटेल म्हणाले, यावर्षी किडीमुळे धानाचा उतारा आला नाही, अशा स्थितीत शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी दिलासा मिळणे गरजेचे आहे. आधीच धान खरेदी केंद्र उशिरा सुरु झाले. त्यात आमच्या काळात शेतकऱ्यांना मिळत होते तेवढाही दर एचएमटी, जय श्रीराम या वाणांना आता नाही. जिल्ह्यात ९० टक्के गावांमधील पैसेवारी ५० टक्के पेक्षा जास्त दाखविल्यामुळे शेतकऱ्यांना शासकिय लाभांपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे. दीड वर्षातील सरकारच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली. सरकार घोषणा आणि मार्केटिंग करण्यात पटाईत असले तरी प्रत्यक्षात लोकांसाठी काय करीत आहे हे कोणालाच समजेनासे झाले आहे.
यावेळी नवनियुक्त डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत वैरागडे व डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.जगदिश शेंडे, सेवादलचे जिल्हाध्यक्ष सोपान आजबले यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रदेश सचिव धनंजय दलाल यांनी केले. संचालन विजय खेडीकर यांनी तर आभारप्रदर्शन वासुदेव बांते यांनी केले. यावेळी डॉ. विकास गभणे, अंगराज समरित, देवचंद ठाकरे, राजु हाजी सलाम, स्वप्नील नशिने, नितीन तुमाने योगेश सिंगनजुडे विनयमोहन पशिने, महेंद्र गडकरी, विजय डेकाटे, राजेश देशमुख, भगवान बावणकर, संजय सतदेवे, जि.प. सदस्य रेखा ठाकरे, ज्योती खवास, उत्तम कळपाते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

भेलच्या महाप्रबंधकांना ५ हजार कोटी खर्च करण्याचा अधिकार
तत्कालीन युपीए सरकारच्या काळात आपल्या पुढाकाराने ‘भेल’ या कारखान्याची पायाभरणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतरच्या लोकप्रतिनिधींनी ‘भेल‘ला कॅबिनेटची मंजुरी नव्हती, असा अपप्रचार जिल्ह्यात सुरू केला. भेलच्या महाप्रबंधकांना पाच हजार कोटी रूपये खर्चाच्या प्रकल्पाला मंजुरी देण्याचा अधिकार आहे, असे असताना केवळ अपप्रचार करणे सुरू आहे.
मागास क्षेत्र विकास योजना बंद
भंडारा जिल्ह्यातून मागासक्षेत्र विकास योजना (बीआरजीएफ) बंद करण्यात आली. राष्ट्रीय कृषी विकास योजना गुंडाळण्यात आली. एमआरईजीएसचा निधी कमी केला, एपीएल कार्डधारकांचे धान्य, करोसीन बंद केले. वाढत्या महागाईला तोंड देताना सर्वसामान्य लोकांच्या नाकीनऊ येत आहे.

Web Title: The government left the farmers on the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.