मोहन भोयर लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला थोर महापुरुष, स्वातंत्र सेनानी किंवा समाजसेवकांच्या नावाने देण्याचा निर्णय राज्य सरकारने ८ ऑक्टोबर २०२४ रोजी घेतला होता. त्या अनुषंगाने राज्यातील १३२ शासकीय आयटीआयला थोर पुरुषांची नावे देण्यात आली. त्यात भंडारा जिल्ह्यातील पाच शासकीय आयटीआयचा समावेश आहे.
तुमसर येथील शासकीय आयटीआयचे नामकरण सम्राट पृथ्वीराज चव्हाण, असे करण्यात आले आहे. येथे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी उबाठा गटाने व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाकडे केली होती. त्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली.त्यामुळे मागणी करणाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.
जिल्ह्यातील या पाच आयटीआयचा समावेशतुमसर येथील शासकीय आयटीआयला सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव देण्यात आले असून भंडारा येथील आयटीआयला रामभाऊ आस्वले, लाखांदूर येथील आयटीआयला नामदेवराव दिवटे, मोहाडी येथील आयटीआयला परमवीर चक्र विजेता मेजर धनसिंग थापा, तर पवनी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला महासती बेनाबाई, अशी नावे देण्यात आली आहेत. मात्र तुमसर येथे सुचविल्याप्रमाणे नामकरण झाले नाही.
८ ऑक्टोबर २०२४ रोजीचा निर्णय८ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार एक सदस्य समिती त्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याशी विचार करून शासकीय औद्योगिक प्रशिक्षणाच्या नावात बदल करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला होता. तत्पूर्वी २३ सप्टेंबर २०२४ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. ३० ऑक्टोबर २०२४ ही नाव सुचविण्याची अंतिम तारीख होती.
तुमसर येथून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला देण्यात यावे, असे पत्र प्राप्त झाले होते. मुंबई येथे संचालक कार्यालयाला तसा अहवाल पाठवण्यात आला. शासन स्तरावरच नाव घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तो अधिकार आम्हाला नाही.- के. एम. मोटघरे, प्रभारी सहसंचालक