शासकीय निधीची अफरातफर
By Admin | Updated: September 6, 2015 00:39 IST2015-09-06T00:39:04+5:302015-09-06T00:39:04+5:30
पवनी तालुक्यातील मोखारा येथील ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीला सन २०१३-१४ व सन २०१४-१५ या दोन वर्षी प्राप्त झालेल्या सहा रुपयांच्या निधीचा खर्च ...

शासकीय निधीची अफरातफर
पत्रपरिषद : सरपंच म्हणतात, आरोप बिनबुडाचे
पवनी : पवनी तालुक्यातील मोखारा येथील ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीला सन २०१३-१४ व सन २०१४-१५ या दोन वर्षी प्राप्त झालेल्या सहा रुपयांच्या निधीचा खर्च न करता तो निधी सरपंचा संध्या वासनिक यांनी स्वत:कडे ठेवून गावाच्या विकासाकरिता आलेल्या निधीचा अपहार केला, असा आरोप ग्राम मोखारा येथील सामाजिक कार्यकर्ते गिरीश नखाते, जागेश्वर पडोळे व राजू नखाते यांनी एका पत्रपरिषदेत केला.
निधीच्या गैरवापराबद्दल १५ आॅगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत प्रश्न विचारण्यात आला. या विषयावर चर्चा करण्यात आली. तेव्हा खात्यातील निधी खर्च झाला हे दाखविण्याकरिता आपण स्वत: जवळ ही रक्कम ठेवल्याचे सरपंचांनी ग्रामसभेत मान्य केले. तसा खुलासा त्यांनी ग्रामसभेत केला. गावाच्या सरपंचा या समितीच्या अध्यक्षा व अंगणवाडी शिक्षिका या समितीच्या सचिव आहेत. सरपंचांनी स्वत: आग्रह करून हे पद आपल्याकडे मागून घेतल्याचा आरोप देखील त्यांनी केला. सरपंचांच्या उत्तराने आपण समाधानी नसून हा एक प्रकारे भ्रष्टाचार व मनमानी कारभार आहे. गावातील लहान मुलांच्या व लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे. याची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन तात्काळ चौकशी करावी व गावकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी पत्रपरिषदेत केली. गावकऱ्यांच्या सह्या असलेल्या निवेदनाच्या प्रती त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी , खंडविकास अधिकारी पवनी, पंचायत समिती सभापती पवनी व वैद्यकीय अधिकारी पवनी यांना दिलेल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)