शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 22:43 IST2018-06-05T22:43:43+5:302018-06-05T22:43:53+5:30

शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सततच्या नापिकीमुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकरी चार वर्षापासून कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद व राज्य सरकारने कोणतेही पाऊल उचलले नसल्याचा आरोप नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मंगळवारला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
भंडारा जिल्ह्यातील धानाचे पीक तुडतुडा या रोगाने पूर्णत: नष्ट झाले. अशा शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे शासनाने त्यांच्या खात्यामध्ये जमा करावे. शेतकऱ्यांना जाहीर केलेली बोनसची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावे. भंडारा शहरातील मंजूर झालेले महिला रूग्णालयाचे बांधकाम सुरु करण्यात यावे. भंडारा जिल्ह्याची जीवनदायी वैनगंगा नदी स्वच्छ करून जिल्ह्यातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. पेट्रोल व डिझेलची दरवाढ कमी करण्यात यावे, शेतकऱ्यांची वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये करण्यात यावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, या मागण्यांचा समावेश आहे. यावेळी माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, नरेश डहारे, मनिष वासनिक यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.