समस्या सोडविण्यासाठी सरकारला वेळ नाही
By Admin | Updated: October 27, 2015 00:38 IST2015-10-27T00:38:53+5:302015-10-27T00:38:53+5:30
अच्छे दिन आणू म्हणणाऱ्या सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. डाळभात खाणे सरकारने हिरावून घेतले आहे.

समस्या सोडविण्यासाठी सरकारला वेळ नाही
प्रफुल्ल पटेल यांचे प्रतिपादन : लाखनी येथे नगरपंचायत निवडणूक प्रचारार्थ सभा
लाखनी : अच्छे दिन आणू म्हणणाऱ्या सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. डाळभात खाणे सरकारने हिरावून घेतले आहे. युतीचे सरकार आपसी भांडणात मशगूल झालेली आहे. सामान्य जनतेच्या व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारला वेळ नाही. त्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी केले.
स्थानिक कच्छी मेमन सभागृहात लाखनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमेटीद्वारे आयोजित नगरपंचायत निवडणूक प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. याप्रसंगी आमदार राजू जैन, जिल्हा परिषदचे सभापती नरेश डहारे, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, तालुकाध्यक्ष डॉ.विकास गभणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक चोले, बाळा शिवणकर, जुल्फीकार हुमणे, दिनेश वंजारी, विनोद भुते, निलेश गाढवे, प्रशांत मेश्राम आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, खासदार व केंद्रीय मंत्री म्हणून सरकारमध्ये काम करताना लाखनीच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. लाखनी येथे प्रत्येक समाजाचे परिपूर्ण सभागृह, सीमेंट रस्ते, भेल उपक्रमाचा प्रारंभ असे विविध काम केली आहे. शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळावा यासाठी प्रयत्न केले. लाखनीचा विकास घडवून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसने देशाचा विकास घडवून आणला आहे. भंडारा जिल्ह्याकडे सातत्याने लक्ष दिले. सिंचनापासून अनेक शिबिरांचे आयोजन करून लोककल्याणकारी कार्यक्रम राबविले. भंडारा सारख्या मागासलेल्या व लाखनीच्या विकासात भर घालण्यासाठी वारंवार निधी उपलब्ध करून दिल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले. आभार प्रदर्शन धनू व्यास यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)