साकोली नगर परिषदेच्या प्रस्तावाला शासनाची मान्यता
By Admin | Updated: September 1, 2015 00:25 IST2015-09-01T00:25:41+5:302015-09-01T00:25:41+5:30
साकोली आणि सेंदुरवाफा वासीयांचे स्वप्न पूर्ण होण्याची अखेर वेळ आली आहे.

साकोली नगर परिषदेच्या प्रस्तावाला शासनाची मान्यता
आनंदोत्सव : जिल्हाधिकाऱ्यांना प्रारुप पाठविण्याचे आदेश
संजय साठवणे साकोली
साकोली आणि सेंदुरवाफा वासीयांचे स्वप्न पूर्ण होण्याची अखेर वेळ आली आहे. साकोलीत नगर पंचायत निवडणुकीची तयारी सुरू होती. परंतु आमदार बाळा काशीवार यांनी साकोलीत नगर परिषद व्हावी, यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. अखेर मंत्रालयाने साकोली नगर परिषदेच्या प्रस्तावाला मान्यता देऊन तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.
प्राथमिक प्रारुप तात्काळ पाठविण्याचे आदेश राजीव आंबीकर कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी दिले आहे. हे आदेश दि. ३१ आॅगस्टचे असून जिल्हाधिकाऱ्यांनी साकोलीच्या तहसीलदारांना हे आदेश पाठविले आहे. दि. ३१ आॅगस्ट रोजीच्या पत्रानुसार, दि. १२ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेअन्वये नवनिर्मित साकोली नगर पंचायतीत सेंदूरवाफा ग्रामपंचायत समाविष्ठ करून साकोली नगर परिषदेचा प्राथमिक उद्घोषणा नव्याने करण्याबाबतच्या प्रस्तावास शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे. तरी याप्रकरणी ग्राम पंचायत सेंदुरवाफा व साकोली नगर पंचायत मिळून साकोली नगर परिषद तयार करण्याबाबत मराठी व इंग्रजी प्राथमिक उद्घोषणेचे प्रारुप शासनाकडे तातडीने पाठविण्यात यावे, असे सदर आदेशात नमूद आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे साकोली नगर परिषदेची कारवाई पुर्णत्वास जात आहे. मागील काही दिवसांपासूनच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. उशिरा का होईना आ.बाळा काशीवार यांच्या प्रयत्नाने नगर परिषद होण्याचे स्वप्न पुर्णत्वास जात आहेत. साकोली व सेंदुरवाफा येथील सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन यासारख्या विविध सोयी सुविधा असून यात नगर परिषदेची भर पडणार असून आदेशाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.