रस्त्याला बनविले गोठा
By Admin | Updated: January 18, 2016 00:35 IST2016-01-18T00:35:18+5:302016-01-18T00:35:18+5:30
शहरातील सहकारनगरातील रस्त्याच्या मधोमध जनावरे बांधून ठेवली जात असल्याने सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्याला बनविले गोठा
नागरिकांमध्ये संताप : तक्रारीनंतरही कारवाई शून्य
भंडारा : शहरातील सहकारनगरातील रस्त्याच्या मधोमध जनावरे बांधून ठेवली जात असल्याने सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी संबंधित नगरसेवक, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना निवेदन देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणी तात्काळ कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा काँँग्रेसचे महासचिव मनोज बागडे यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी सहकार नगर येथे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. त्यात दत्तू भोंगाडे यांची आवारभिंतसुद्धा पाडण्यात आली. त्याच रस्त्यावर असलेले जनावरेसुद्धा हटवू, असे आश्वासन नगर पालिकेने त्यावेळी दिले होते. परंतु, त्यानंतर दत्तू भोंगाडे यांनी पुन्हा १ जानेवारी २०१६ रोजी पालिकेने पाडलेल्या जागेवर पुन्हा बांधकाम सुरू केले. त्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना केली. या रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे तसेच जनावरे रस्त्यावर राहत असल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले. परंतु, त्यावर पालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. रस्त्यावर जनावरे बांधत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा दत्तू भोंगाडे यांचे अतिक्रमण तोडण्यात यावे, ताराचंद साकुरे, हेमंत साकुरे, सुरेश साकुरे, वामन साकुरे, हिरामन साकुरे, गोपीचंद साकुरे व अन्य लोकांचे जनावरे रस्त्यावर बांधत असल्याने त्यांच्यावर जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी मनोज बागडे, बबलू बाळबुधे, नितीन वंजारी यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)