वाहन मिळाले; अधिकारी गायब नऊ महिन्यांचा वनवास संपला
By Admin | Updated: April 5, 2015 00:55 IST2015-04-05T00:55:16+5:302015-04-05T00:55:16+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत देण्यात आलेले ..

वाहन मिळाले; अधिकारी गायब नऊ महिन्यांचा वनवास संपला
आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह
चुल्हाड (सिहोरा) : येथील ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत देण्यात आलेले आपत्कालीन वैद्यकीय आरोग्य सेवेचे बेपत्ता वाहन नऊ महिन्यच्या प्रदिर्घ कालावधीनंतर परतले मिळाले आहे. मात्र, वैद्यकीय अधिकारी अद्याप मिळाला नसल्याने आरोग्य सेवेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
वैनगंगा नद्यांचे खोरे, पुरग्रस्त गावे, जंगलव्याप्त गावात नागरिकांचे वास्तव्य, यामुळे सिहोरा परिसरात पाऊण लाख नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी तीन जिल्हा परिषद क्षेत्रात ८-१० कि.मी. अंतरावर रुग्णालय निर्मितीला शासन स्तरावर मंजुरी मिळाली. चुल्हाड येथे आग्ल दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, सिहोरा क्षेत्रात ग्रामीण रुग्णालय आणि येरली क्षेत्रातील नागरिकांच्या सेवेसाठी आयुर्वेदीक दवाखाना कार्यरत आहे. या दवाखान्यात वैद्यकिय अधिकारी कार्यरत आहेत. आरोग्य सेवा नागरिकांना दर्जेदार दिली जात आहे. कोणत्याही दवाखान्यात रुग्णाच्या तक्रारी नाहीत.
औषधोपचार आणि स्वच्छता जमेची बाजु आहे. परिसरातील ४७ गावात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना आपत्कालीन वैद्यकिय सेवा उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत १०८ क्रमांकाचे २०१४ मध्ये वाहन मंजूर करण्यात आले. या वाहनात तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती असताना दोन वैद्यकिय अधिकारी नियुक्त करण्यात आले. यात डॉ. मंगेश आगाशे, डॉ. जवाहर राहांगडाले यांची नियुक्ती होती. परंतु आरोग्यसेवक, परिचारिका यांची नियुक्ती करण्यात आली नाही. सिहोरा ग्रामीण रुग्णालयात हे वाहन सहा महिने सेवेत असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना अल्प मानधन देण्यात आले. परंतु अचानक आगष्ट २०१४ मध्ये हक्काचे वाहन सिहोरा परिसरातून बेपत्ता करण्यात आले होते. या वाहनाचे कंत्राट भारत विकास ग्रुपला संचालित करण्याचे देण्यात आले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात वाहन नसल्याने सिहोऱ्यातून हे वाहन पळविण्यात आले. यानंतर वाहनाने वाशिम जिल्ह्यात प्रवास केला असल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात रायुकाँचे तालुकाध्यक्ष धनेंद्र तुरकर यांनी वाहन प्राप्तीकरिता आरोग्य विभागाला निवेदन दिले. पंरतु नऊ महिने झाले असतांना आरोग्य विभाग हक्काचे वाहन देत नसल्याची माहिती पंचायत समिती सभापती कलाम शेख यांना मिळताच आंदोलनाची भूमिका घेतली.
आरोग्य विभाग पुणे कार्यालयात सभापती कलाम शेख यांनी वाहन प्राप्त करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांना वारवांर संपर्क साधला. नऊ महिने या वाहनासाठी आरोग्य विभागाकडे हा विषय लावून धरला. या कालावधीत लोकमतने सातत्याने वृत्त प्रकाशित करुन शासनाचे लक्ष वेधले. पळविण्यात आलेले वाहन नऊ महिन्याच्या कालावधीनंतर २६ मार्चला पुन्हा सिहोरा रूग्णालयात दाखल झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना व रूग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळेल ही अपेक्षा आता वर्तविण्यात येत आहे. वाहन मिळाले असले तरी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रूग्णांना आरोग्य सुविधा कशा प्रकारे मिळेल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आरोग्य विभागाने त्वरित डॉक्टरची नियुक्ती करावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)
वाहन प्राप्त झाले असले तरी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांची नियुक्ती अत्यावश्यक आहे. संबंधित कंपनी ही नियुक्ती करतांना हयगय करीत असल्याने नागरिकांना सेवा मिळत नाही. ही पदे तत्काळ भरण्यासाठी आपण रास्ता रोको आंदोलनाची भूमिका घेणार आहोत.
- कलाम शेख,
सभापती पं.स. तुमसर