गोसीखुर्दचा जलस्तर २४० मीटर होणार

By Admin | Updated: September 30, 2014 23:32 IST2014-09-30T23:32:20+5:302014-09-30T23:32:20+5:30

विदर्भातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर २४० मिटर पर्र्यंत वाढविण्याचे निर्देश केंद्रीय जलआयोगाने दिल्याने उद्यापर्यंत २४० मिटर पर्यंत जलस्तर होणार आहे.

Gosikhurd's water level will be 240 meters | गोसीखुर्दचा जलस्तर २४० मीटर होणार

गोसीखुर्दचा जलस्तर २४० मीटर होणार

धरणाची ३३ वक्रद्वारे बंद : हजारो हेक्टर शेती पाण्याखाली
गोसेबुज : विदर्भातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर २४० मिटर पर्र्यंत वाढविण्याचे निर्देश केंद्रीय जलआयोगाने दिल्याने उद्यापर्यंत २४० मिटर पर्यंत जलस्तर होणार आहे. काल रात्रीपासून धरणाचे सर्व ३३ वक्रद्वारे बंद करण्यात आले आहेत. आज धरणाचा जलस्तर ५ से.मी. ने वाढून ते २३९.९०० मिटर झाला आहे.
२४० मिटरवर भंडारा जिल्ह्यातील पाथरी व सावरगाव सोडले तर कोणत्याही गावाला धोका नाही. पण नागपूर जिल्ह्यातील अनेक गावात धरणाचे पाणी शिरले आहे. भंडारा व नागपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती धरणाच्या पाण्याखाली गेली आहे. पाथरी मध्ये एक एक घर गोसीखुर्द धरणाच्या पाण्यात बुडत आहेत. आतापर्यंत मोठ्या संख्येने घरे पाण्याखाली आले आहेत. जलस्तर वाढविण्याची वेळ, धानाच्या पिकाची वेळ, सणासुदीची वेळ व प्रकल्पग्रस्त गाव सोडण्याची वेळ एकाच वेळेस आल्यामुळे प्रकल्पग्रस्तांना गाव रिकामे करण्याकरिता मोठ्या अडचणी येत आहेत.
या गावातील ४३८ कुटुंब धरणाच्या पाण्याने बाधीत होणार आहेत. जुन्या गावात अजूनही ३० कुटुंब राहत आहेत. पाथरी व बुडीत क्षेत्रातील अनेक गावातील प्रकल्पग्रस्तांनी पुढे दसरा, दिवाळी व इतर सण असल्यामुळे धरणातील जलस्तर वाढविण्याला नवीन गावठाणात स्थानांतरण होईपर्यंत स्थगीती देण्याची मागणी केली होती. नवीन गावठाणात स्थानांतरण करून प्रकल्पग्रस्त सरकारला सहकार्य करीत आहेत. पण सरकार प्रकल्पग्रस्तांच्या समस्येकडे दुर्लक्ष करून धरणाचा जलस्तर वाढवित आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांत असंतोष पसरत आहे. धरणाचा जलस्तर २४०.२०० मीटर पर्यंत गेल्यास गावातील मुख्य रस्ता बुडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या जुन्या घरातील साहित्य काढण्याकरिता फार अडचणी येणार आहेत. सध्या प्रकल्पग्रस्त घरातील साहित्य काढण्या मात्र व्यस्त आहेत. सावरगावात चारही बाजूने पाणी झाले असून ईटगाव कडे जाणारा एकमात्र रस्ता सुरु आहे. सर्व प्रकल्पग्रस्तांनी गाव सोडले असून ३ कुटुंब त्यांची शेती गावाजवळ असल्यामुळे राहत आहेत. नागपूर जिल्ह्यातील जीवनापूर, खराडा, नवेगाव, सिर्सी, कोच्छी, पिपरी आदी गावात धरणाचे पाणी शिरले आहे. ज्या प्रकारे जलस्तर वाढविला जाईल त्या प्रामणे बुडीत क्षेत्रातील गावे रिकामे करण्याला गती येणार आहे. गावे रिकामी करण्याकरिता प्रकल्पग्रस्त सहकार्य करीत असल्यामुळे धरणातील जलस्तर वाढविण्याला मदत होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Gosikhurd's water level will be 240 meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.