सभा रद्द झाल्याने गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2015 00:15 IST2015-08-21T00:15:55+5:302015-08-21T00:15:55+5:30
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी आयोजित सभेत सहभागी होण्याचे आवाहन आमदार अॅड.रामचंद्र अवसरे यांनी केले होते.

सभा रद्द झाल्याने गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचा हिरमोड
भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी आयोजित सभेत सहभागी होण्याचे आवाहन आमदार अॅड.रामचंद्र अवसरे यांनी केले होते. मात्र तेच सभेत न पोहचल्यामुळे सभा रद्द झाली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा हिरमोड झाला. त्यानंतर आमदारांविरुद्ध संताप व्यक्त करुन प्रकल्पग्रस्त आल्यापावली गावाकडे परतले.
आमदार अॅड.रामचंद्र अवसरे यांनी गुरुवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी सभा आयोजित केली होती. त्यानुसार प्रकल्पग्रस्तांनी आपल्या समस्या आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात सादर केल्या. अर्ज मिळाल्याची पावतीसुध्दा प्रकल्पग्रस्तांना देण्यात आली.
आज सकाळपासूनच प्रकल्पग्रस्तांनी सभा असल्यामुळे भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एकत्रित झाले होते.
यात चिचाळ, सौदड, खापरी, नेरला, मौदी, सुरेवाडा, कोरंभी(भंडारा), वडद, जामगाव, जाख यासह जवळपास १५ गावातील प्रकल्पग्रस्तांचा समावेश होता. प्रकल्पग्रस्तांनी सभेची दोन वाजतापर्यत वाट पाहिली. वेळ झाल्यानंतरही सभा सुरु झाली नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी विचारपूस केली असता सभा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा हिरमोड झाला. संताप व्यक्त करुन सभा रद्द करायची होती तर तशी सूचना प्रकल्पग्रस्तांना का दिली नाही. हातातले काम सोडून सभेत सहभागी होण्यासाठी आल्याचेही अनेक प्रकल्पग्रस्तांनी सांगितले.
यावेळी शेखर रामटेके, राधेशाम भाजिपाले, प्रदीप भुरे, श्रीधर पंचभाई, गुरुदास मेश्राम, केशव नखाते, मोहनलाल मेश्राम, रमेश लेंडे, महादेव कुरंजेकर, चंद्रभान वंजारी, सुर्यभान वंजारी, वाल्मीक नागपुरे, कला चामलाटे, अंकुश आंबाघरे, मिताराम उके, आसाराम उके, ताराचंद आंबाघरे यांच्यासह शेकडो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी गुरुवारला आढावा बैठक आयोजित केली होती. मात्र जिल्हाधिकारी धीरजकुमार हे विभागीय आयुक्तांनी आयोजित केलेल्या नागपूर येथील सभेत सहभागी झाल्याने आढावा बैठक वेळेवर रद्द करण्यात आली. रद्द केलेली सभा लवकरच घेण्यात येईल.
- अॅड.रामचंद्र अवसरे,
आमदार, भंडारा.