गोसेखुर्दच्या ‘बॅक वॉटर’चा फटका
By Admin | Updated: October 8, 2014 23:20 IST2014-10-08T23:20:33+5:302014-10-08T23:20:33+5:30
गोसेखुर्द प्रकल्पामुळे हजारो हेक्टर शेतीला नवसंजिवनी मिळाली असली तरी, प्रकल्पामुळे अनेक गावांतील हजारो नागरिकांना याची झळ पोहचली आहे. कारधा गावाला गोसेच्या बॅक वॉटरचा

गोसेखुर्दच्या ‘बॅक वॉटर’चा फटका
कारधावासीयांमध्ये रोष : पुनर्वसनाची प्रक्रिया १५ वर्षांपासून रखडली
भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पामुळे हजारो हेक्टर शेतीला नवसंजिवनी मिळाली असली तरी, प्रकल्पामुळे अनेक गावांतील हजारो नागरिकांना याची झळ पोहचली आहे. कारधा गावाला गोसेच्या बॅक वॉटरचा फटका बसत असल्याने अनेकांची घरे कोसळण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनाने गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मागील १५ वर्षांपासून मार्गी लावला नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
पूर्व विदर्भातील जिल्ह्यात 'हरितक्रांती' व्हावी, यासाठी महत्वकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. यामुळे हजारो हेक्टर शेतजमिनी ओलीताखाली आल्याने शेतकऱ्यांसमोरील ओलीताचा प्रश्न मिटला आहे. प्रकल्पामुळे शेतीला मुबलक पाणी मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी वरदान गोसेखुर्द प्रकल्प वरदान ठरले आहे. मात्र या प्रकल्पामुळे अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले असले तरी, अजुनही कारधा गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरी आहे.
सुमारे १५ वर्षांपासून कारधा गावाची पुनर्वसन प्रक्रिया रखडली असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष पसरला आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या बॅक वॉटरचा फटका कारधा गावाला बसत असल्याने पावसाळ्यात येथील नागरिक जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत.
गावाचे पुनर्वसन करण्याच्या नावावर प्रशासन गावकऱ्यांना केवळ आश्वासन देत असल्याचा आरोप नागरिकांनी केली आहे. प्रकल्पाचे पाणी गावात येत असल्याने अनेक घरांची पडझड झाली आहे. तर अनेक घर जिर्णावस्थेत आहेत. पाण्याच्या फटक्यामुळे अनेक घर पडण्याच्या स्थितीत असतानाही गावाचे पुनर्वसनही होत नाही व त्यांना नविन घर बांधण्यासही विरोध होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांची 'इकडे आड, तिकडे विहिर' अशी परिस्थिती झाली आहे.
तिनशेच्यावर घरांचा प्रश्न असल्याने प्रशासनाने गावाच्या पुनर्वसनाबाबत त्वरीत निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच शितला करंडी, अश्विन चौरे, शबाना खॉं पठाण, चंदा भुरे, कल्पना रेहपाडे व श्यामकला शिंदे यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)