सिहोरा परिसरात जनावरे खरेदी विक्रीचा गोरखधंदा
By Admin | Updated: May 22, 2015 01:08 IST2015-05-22T01:08:54+5:302015-05-22T01:08:54+5:30
राज्य शासनाने गो-हत्या बंदीचा कायदा लागू केला असताना छुप्या मार्गाने बैल आणि गाय या जनावरांची कत्तलीसाठी सिहोरा परिसरात खरेदी विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे.

सिहोरा परिसरात जनावरे खरेदी विक्रीचा गोरखधंदा
रंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा)
राज्य शासनाने गो-हत्या बंदीचा कायदा लागू केला असताना छुप्या मार्गाने बैल आणि गाय या जनावरांची कत्तलीसाठी सिहोरा परिसरात खरेदी विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे.
आंतर राज्यीय सिमेवर असणाऱ्या सिहोरा परिसरात छुप्या मार्गाने जनावरे खरेदी विक्री करणाऱ्या केंद्राचा 'लोकमत'ने शोध घेतला असता धक्कादायक वास्तव उघडकीस आले. या आधी पासून नजिकच्या मध्यप्रदेशात गो-हत्या बंदीचा कायदा लागू करण्यात आल्याने राज्याच्या सिमावर्ती गावातील बैल बाजारात जनावरे विक्रीला आणली जात आहे. परंतु राज्य शासनाने ही कायद्या लागू करताच जनावरांची आयात थांबली आहे. बैल बाजारात शुकशुकाट दिसून येत आहे. यामुळे जनावर खरेदी करणारे माफिया, एजंट आणि दलाल यांचा व्यवसाय अडचणीत आलेले आहे.
सिहोरा परिसरात १ आणि मध्यप्रदेशातील सिमावर्ती गावात २ अशा जनावरे खरेदी केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. जंगल व्याप्त गावात ही केंद्र आहेत. या केंद्रावर वस्त्या नामक एजंट सक्रिय आहे. सिहोरा परिसरात असणारा हा केंद्र महत्वपूर्ण मानला जात आहे. या केंद्रांवरच जनावरांची साठवणूक केली जात आहे. या जनावरामध्ये गाय आणि बैल यांचा समावेश आहे. हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारा बस्त्या नामक एजंट ३०-४० बैल आणि गाय ही जनावरे एका साठवणूक केंद्रात गोळा करीत आहे.
या केंद्रापासून पोलीस प्रशासन अनभिज्ञ असावे असे चित्र निर्माण करण्यात आले आहे. ६ ते ७ फुट उंच भिंती तयार करण्यात आल्या असून या जनावरांना चारा आणि पानी दिले जात नाही. यामुळे या जनावरांची अवस्था वाईट झाली आहे. आठवड्यातून दोन दिवस या जनावरांना विक्रीसाठी काढले जात आहे. कोंबड बाजाराच्या धर्तीवर या व्यवसायाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
सोमवार, मंगळवार जनावर खरेदीचा दिवस ठेवण्यात आलेला आहे. रविवार आणि बुधवार असे दोनच दिवस या जनावरांची विल्हेवाट लावण्यात येत आहे.मध्यप्रदेशात खरेदी करण्यात आलेली जनावरे या केंद्रावर गुरूवार, शुक्रवार आणि शनिवार दिनी आणली जात आहे. जनावरे खरेदी करणाऱ्या माफियांना या परिसरातून जनावरे विक्री होत नाही. १८ ते २० कि़मी. अंतरावरील रामपूर या गावात बुधवार आणि रविवार दिवस आधीच ही जनावरे पोहचती केली जात आहे.