शहरात सद्भावना रॅली
By Admin | Updated: September 6, 2014 01:36 IST2014-09-06T01:36:33+5:302014-09-06T01:36:33+5:30
समाजात सलोखा, शांतता, बंधुता व एकता कायम राखणे हे भारतीय नागरिकांचे कर्तव्य असून भारतीय राज्यघटनेत सांगितलेल्या नागरिकांच्या कर्तव्याचे पालन सुध्दा जनतेने करावे.

शहरात सद्भावना रॅली
भंडारा : समाजात सलोखा, शांतता, बंधुता व एकता कायम राखणे हे भारतीय नागरिकांचे कर्तव्य असून भारतीय राज्यघटनेत सांगितलेल्या नागरिकांच्या कर्तव्याचे पालन सुध्दा जनतेने करावे. समाजात सद्भावना निर्माण होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेला हा सद्भावना रॅलीचा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे मत जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश जी. जे. अकर्ते यांनी व्यक्त केले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हयात शांतता व सुव्यवस्था तसेच धार्मिक सलोखा कायम राहावा यासाठी आज सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. लाल बहादूर शास्त्री शाळेमध्ये रॅलीचा शुभारंभ जी. जे. अकर्ते यांनी हिवरी झेंडी दाखवून केला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधीक्षक कैलास कणसे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी सुनील पडोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बंसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, उपविभागीय अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, नगर परिषद प्रशासन प्रकल्प अधिकारी विजय देवळीकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन गोरे, जिल्हा कृषी विस्तार अधिकारी उपस्थित होते.
ही सद्भावना रॅली लालबहादूर शास्त्री चौकातून हेडगेवार चौक, बजरंग चौक, मस्जीद, मुस्लीम लायब्ररी चौक, पोस्टआॅफीस चौक, बसस्थानक या मार्गे शिवाजी स्टेडियम येथे पोहोचली. रॅलीमध्ये एकतेचा संदेश देणारे पारंपारिक वेशभुषेतील तसेच महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिका साकारलेले विद्यार्थी, शाळांचे विद्यार्थी, स्काऊट, राष्ट्रीय छात्र सेना, शिक्षक तसेच इतर प्रशासकीय अधिकारी, पोलीस बॅन्ड पथक यांचा समावेश होता. या रॅलीमध्ये वाजत असलेल्या देशभक्तीपर गितांनी शहरात सलोख्याचे वातावरण निर्माण केले होते. चौका-चौकातून अनेक लोक रॅलीमध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होत होते.
शिवाजी स्टेडियमला रॅलीचा समारोप करतांना जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे म्हणाल्या, समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये एकमेकांप्रती, निसर्गाविषयी तसेच पशुप्राण्याविषयी सदृभावना निर्माण व्हावी हा संदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या रॅलीचे आयोजन केले आहे. देशाच्या विकासासाठी शांतता व सुव्यवस्थेचे वातावरण निर्माण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. आज रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी हा अनुभव कायम स्मरणात ठेवावा. देशाचे भविष्य तुमच्या हातात आहे. मोठे झाल्यानंतर देशाचा विकास करतांना ही सद्भावना तुम्हाला प्रेरणा देईल. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांनी सर्वांचे आभार मानले. या रॅलीमध्ये शहरातील १० शाळांचे १ हजार विद्यार्थी, ७५ स्काऊट गाईडचे विद्यार्थी सहभागी झाले होते.