परस्परांबद्दल सद्भाव, बंधूभाव जोपासा

By Admin | Updated: July 21, 2016 00:23 IST2016-07-21T00:23:28+5:302016-07-21T00:23:28+5:30

कुठलाही धर्म हिंसा तथा द्वेष करायची शिकवण देत नाही. प्रेम, सद्भावना ही बंधूभाव जोपासण्याचा खरा आधार आहे.

Goodness about brotherliness, brotherhood Jopaas | परस्परांबद्दल सद्भाव, बंधूभाव जोपासा

परस्परांबद्दल सद्भाव, बंधूभाव जोपासा

संजय जोगदंड यांचे प्रतिपादन : कार्यक्रमातून घडले सर्वधर्मसमभावाचे दर्शन
भंडारा : कुठलाही धर्म हिंसा तथा द्वेष करायची शिकवण देत नाही. प्रेम, सद्भावना ही बंधूभाव जोपासण्याचा खरा आधार आहे. आनंदाच्या पर्वावर परस्परांबद्दली शंका दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी सर्व धर्मियांतील लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. जो मनुष्य आपल्या धर्माचे पालन इमानेइतबारे करतो तो कधीही अन्य धर्माचा तिरस्कार करू शकत नाही, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांनी केले.
येथील मुस्लिम लायब्ररी सभागृहात सोमवारी (१९ जुलै) आयोजित ईद मिलन कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वधर्म समभावाचा संदेश जनमाणसात पोहचावा या दृष्टीकोणातून हिंदू, मुस्लिम तथा धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींना एका मंचावर आणण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.
यावेळी मंचावर समाजसेवी डॉ.कुतूबुद्दीन अहमद, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय एकापुरे, सौदागर मोहल्ला मस्जिदचे मौलाना फराज अहमद, लॉयन्सचे पदाधिकारी जीवनचंद्र निर्वाण, साई मंदिराचे पुजारी पांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक राम चाचेरे, जमियते उलेमा हिंदचे मौलाना मुफ्ती मोहम्मद साजीद आदी उपस्थित होते.
संजय एकापुरे म्हणाले, जगात कुठलाही धर्म वाईट कृत्याला समर्थन करीत नाही. वाईट कृत्यातून धर्माला बदनाम करणाऱ्यांना सर्वांनी एकत्रित येवून धडा शिकवायला हवा. जीवनचंद्र निर्वाण म्हणाले, भंडारा शहरात सर्वधर्मीय बांधव एकोप्याने व गुण्यागोविंदाने राहतात. एकमेकांच्या उत्सवात हिरीरीने भाग घेतात, ही खरच भंडारेकरांसाठी भूषणावह बाब आहे. मौलाना फराज अहमद म्हणाले, भारत हा विविध संस्कृती जोपसणारा देश आहे. कुणाबद्दल कधीही वाईट बोलू नये व वर्तनही करू नये. राष्ट्रवाद ही संकल्पना सर्वांनी जोपासलीच पाहिजे. डॉ.कुतुबुद्दीन अहमद यांनी सदर कार्यक्रमाची प्रशंसा केली. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची खरी जबाबदारी नागरिकांची आहे आणि भंडारावासीय ती जबाबदारी योग्यरितीने पार पाडीत आहे. राम चाचेरे यांनी हिंदू धर्मातील वसुधैव कुटुंबकम ही भावना विस्तृतपणे अधोरेखीत केली. संघाने मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या माध्यमातून मुस्लिम समाजासोबत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. पांडे महाराज म्हणाले, हिंदू धर्म मानवतावादी आहे. गीतेमध्ये दिलेले उपदेश संपूर्ण मानवजातीसाठी कल्याणकारी आहेत. दुसऱ्या धर्माचा सदैव आदर व सन्मान करणे अत्यंत आवश्यक आहे. मौलाना साजिद म्हणाले, इस्लाम धर्माची शिकवण सांगते की, ज्या देशात आपण राहतो त्या देशाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. पवित्र कुराण ग्रंथ हा केवळ मुस्लिमांसाठी नव्हे सर्व मानवजातीसाठी आहे.
कार्यक्रमाचे आयोजन फुरकान हुसैन, वसीफ खान, सलीम खान, सरफराज खान यांनी केले. संचालन जमाते इस्लामचे इकबाल कैफ यांनी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी, तहसीलदार सुशांत बनसोडे, पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक चाबुकस्वार, नगरसेवक मकसूद खान, शमीम शेख, हिवराज उके, विकास मदनकर, श्री शीतला माता देवस्थान समितीचे ईश्वरलाल काबरा, धुर्वे, उबेद खान, आबिद सिद्धीकी, मुकेश थानथराटे, कृष्णा उपरीकर, शैलेंद्र श्रीवास्तव, जकारिया खान, प्रदीप ढबाले, मुशीर अहमद, समीर खान, अनवर खान, जुनैद अख्तर, कोहाड, अकील सिद्धीकी, सुज्जा खान, शहजाद पटेल, कलाम खान, अवेश खान, अब्दुल करिम खान, सकलैन कैफ, शाहरूख खान, शाहरूख शेख, अररास खान उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Goodness about brotherliness, brotherhood Jopaas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.