‘अच्छे दिन’च्या सरकारने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात

By Admin | Updated: May 23, 2017 00:16 IST2017-05-23T00:16:56+5:302017-05-23T00:16:56+5:30

निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि बेरोजगार तरूणांच्या हाताला काम देण्याचे वचन देऊन ‘अच्छे दिन’चा नारा देणाऱ्या ...

'Good Day' government made farmers betrayal | ‘अच्छे दिन’च्या सरकारने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात

‘अच्छे दिन’च्या सरकारने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात

आंदोलन चिघळले : प्रफुल्ल पटेलांसह कार्यकर्त्यांना अटक, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प
इंद्रपाल कटकवार। लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि बेरोजगार तरूणांच्या हाताला काम देण्याचे वचन देऊन ‘अच्छे दिन’चा नारा देणाऱ्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केला आहे. केंद्र व राज्य सरकारकडून आतापर्यंत शेतकऱ्यांना कोणतीही मदत झालेली नाही. सरकारच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडत आहे. आमचा संयम म्हणजे भित्रेपणा समजू नये. आमचा आवाज दडपण्याचा शासन प्रयत्न करीत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. येणाऱ्या काळात शेतकरी व बेरोजगारांसाठी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा खणखणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी दिला.
भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पुकारलेल्या आंदोलनात ते बोलत होते. या आंदोलनाचे नेतृत्त्व स्वत: प्रफुल पटेल यांनी केले. यावेळी मंचावर माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, माजी आमदार राजेंद्र जैन, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, सभापती नरेश डहारे, ज्येष्ठ पदाधिकारी दामाजी खंडाईत उपस्थित होते.
भंडारा जिल्ह्यातील शेतकरी व जनसामान्यांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता गप्प बसणार नाही, असे सांगून प्रफुल पटेल म्हणाले, सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज चढला आहे. शेतकऱ्यांप्रती अर्वाच्च भाषेत बोलून भाजपने खरी संस्कृती दाखवून दिली आहे. आजचे धरणे आंदोलन हे केवळ एक दिवसापुरते मर्यादित न राहता, शेतकऱ्यांच्या हितासाठी यापुढे तीव्र जनआंदोलन करण्यात येईल. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार सामान्य जनतेला भुलथापा देऊन लोकांना मुर्ख बनवून सत्तेत बसले. परंतु आता जनतेला कळून चुकल्याने सामान्य माणूस या सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणविणारे गाढ झोपेत आहेत. मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी नवीन उद्योग उघडण्याच्या नावावर लाटण्यात आल्या. ना उद्योग आला ना रोजगार मिळाला.
ओबीसीची व इतर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती राज्य सरकारने बंद केली. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाला शिक्षण घेणे कठिण झाले आहे. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आरोग्य मंत्री असताना येथील महिला रूग्णालयाच्या जागेचा प्रश्न कायम आहे. पाकिस्तानचे भारतावर आजही हल्ले सुरू असून देशात मोठे संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योजना हवेतच विरली आहे. अशा नानाविध समस्यांची दखल शासनाने न घेतल्यास राष्ट्रवादी पुढे तीव्र आंदोलन उभारेल असा इशाराही खा. पटेल यांनी दिला. ४०० रूपयांचे सिलिंडर ९०० रूपयात मिळते, ३००० रूपये मिळणारा धानाचा भाव १,४५० वर आला, हेच का ते अच्छे दिन असे म्हणून खा.पटेल यांनी भविष्यातील आंदोलनाचे बिगुल आज फुंकले.
या धरणे आंदोलनात सभापती शुभांगी रहांगडाले, अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश जैन, अ‍ॅड. जयंत वैरागडे, तुमसरचे माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, कल्याणी भुरे, लोकेश खोब्रागडे, रूपेश खवास, संजय सतदेवे, माजी नगराध्यक्ष विजयकुमार डेकाटे, माजी सभापती सुनंदा मुंडले, विठ्ठल कहालकर, अविनाश ब्राम्हणकर, हेमकृष्ण वाडीभस्मे, शैलेश मयुर, नरेंद्र झंझाड, लोमेश वैद्य, तोमेश्वर पंचभाई, वासुदेव बांते, देवंदच ठाकरे, विकास गभणे, नरेश चुन्ने, प्रभाग गुप्ता, हितेश सेलोकर, विनोद बागडे, राहुल वाघमारे, प्रा.बबन मेश्राम, शैलेश खरोले, गजानन बादशाह, मोनु गोस्वामी, प्रमोद लेंढे, माजी नगराध्यक्ष भगवान बावनकर, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, मजूर संघाचे अध्यक्ष कैलास नशिने, आशा रहांगडाले, रेखा ठाकरे, ज्योती टेंभुर्णे, अरूण गोंडाणे, हरीदास बडोले आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.

पाच मिनिटांचा अल्टीमेटम
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारावे, यासाठी खा.पटेल यांनी जिल्हा प्रशासनाला पाच मिनिटांचा अल्टीमेटम दिला होता. वेळ संपल्यानंतर खा.पटेल स्वत: मंडपातून उठून शेतकरी व कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय महामार्गावर जावून बसले. यावेळी महामार्गावरील वाहतूक ४० मिनिटे ठप्प होती. वारंवार सुचना देऊनही आंदोलकर्ते जुमानत नसल्याने शेवटी खासदार पटेल यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. काही वेळेनंतर सुटका करण्यात आली.
‘भेल’ला परवानगी नसेल तर गुन्हा नोंदवा
भेल कारखान्याला परवानगी नसेल तर आमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, विनाकारण जनतेची दिशाभूल करू नका, असा जाहीर ईशारा कुणाचेही नाव न घेता प्रफुल पटेल यांनी दिला. परंतु हा ईशारा कुणाच्या दिशेने होता, हे आंदोलनकर्त्यांना मात्र समजला होता.
रणरणत्या उन्हात आंदोलकांचा ठिय्या
या आंदोलनात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. ४५ अंश तापमानात कुणाचीही गैरसोय होऊ नये, यासाठी आंदोलनस्थळी थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मंचावरच्या आंदोलनकांचीही याच पाण्याने तहान भागविली.

Web Title: 'Good Day' government made farmers betrayal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.