तलावावर आढळले कलहंस बदक
By Admin | Updated: March 2, 2015 00:45 IST2015-03-02T00:45:35+5:302015-03-02T00:45:35+5:30
लाखनी - साकोली व भंडारा तालुक्यातील विविध तलावावर स्थलांतरित व स्थानिक पाणपक्षी गणना केली.

तलावावर आढळले कलहंस बदक
लाखनी : लाखनी - साकोली व भंडारा तालुक्यातील विविध तलावावर स्थलांतरित व स्थानिक पाणपक्षी गणना केली. ही गणना स्थानिक ग्रीन फ्रेन्डस् नेचर क्लबद्वारे वनविभाग भंडारा व वनक्षेत्र लाखनी - साकोली व नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प यांचे सहकार्याने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली.
दुर्मिळ कलहंस बदक (ग्रे लग गुज) रामपुरी व सोनमाळा तलावावर मोठ्या प्रमाणात आढळून आले. त्याचप्रमाणे स्थलांतरित पाणबदकामध्ये चक्रवाक (रुडी शेल्डक), नकटा (कांब डफ), लहान स्वरल (लेसर व्हीसलिंग डक), गडवाल, तरंग (युरेशियन विगन), धनवर बदक (स्पॉट बिल डक) थापट्या (नार्दन शॉवेलर), चक्रांग बदक (कॉमन टिल), तलवार बदक (नार्दन पिनटेल) अटला बदक (कॉटन टिल), मोठे लालसरी बदक (रेड प्रेस्टेड पोचार्ड), लालसरी (कॉमन पोचार्ड), शेंडी बदक (टफ्टेड डक), रंगीत करकोचा (पेंटेड स्टार्क), शेकाटया (ब्लॅक पिंगेड सिल्ट) स्थलांतरित पाणबदकासोबत स्थानिक पाणपक्षी चांदी बदक (कॉमन फुट), कमळ पक्षी (फेंजट टेन्ड जॅकाना), सोनपंखी कमळपक्षी (ब्रांझ विंगेड जकाना), टिटवी, माळटिटवी, कुरव (गुल), सुरव (टर्न), पाणडुबी (लिटल ग्रिब), लिटल कारमोरंट (छोटा पाणकावळा), तिरंदाज (डार्टर), लहान बगळा (लिटिल इग्रेट), मोरबगळा (ग्रेट इग्रेट) गायबगळा (कॅटल इ ग्रेट), राखी बगळा (ग्रे हेरॉन), पाणकांडी बगळा (पर्पल हेरॉन) वंचक (इंडियन वांड हेरॉन), पांढरा कंकर (व्हाईट आयबिस), काळा कंकर (ब्लॅक आयबिस), उघडचोच करकोचा (ओपनबिल स्टार्क), जांभळी पानकोंबडी (पर्पल मुरदेव), साधी पाणकोंबडी (वाटरहेन), खंडया, कवडया ढिवर (किंगफिशर), पाणपाकोळी (वॉटर स्वलो), तुतवार (सॅडपाईटवर), चिलखा (फ्लॉवर) व मार्श हॅरिहर (दलदली हरीण), आॅस्प्रे, शिकरा यासोबत इतर अनेक झाडावरील पक्षी आढळले.
पक्षीगणना तालुक्यातील भुगाव मेंढा, सोमनाळा, रामपुरी, बरडकिन्ही, रेंगेपार (कोहळी), लाखनी, धाबेटेकडी, व्याहारवानी, पालांदुर, किटाडी, मांगली, नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत असलेल्या खुर्शिपार, रेंगेपार (कोठा), चांदोरी, उसगाव, गौरीडोह, अशोकनगर, रिसाळा तलाव, किसनपूर तलाव, झिरेगाव बांध, मिरेगाव येथे डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्याच्या कालावधीत बी.एन.एच.एस. च्या नियमाप्रमाणे घेण्यात आले. ग्रीन फ्रेन्डसचे संयोजक प्रा. अशोक गायधनी यांनी पक्षीमित्रांना युरोप, सैबेरिया, मंगोलिया, लडाख, काश्मिर, तिबेट या भागातुन आलेल्या पाणबदकाचे दर्शन घडविले.
पक्षीगणना जिल्हा उपवनसरंक्षक विनय ठाकरे, मानद वन्यजीव अधिकारी राजकमल जोब, सहाय्यक वनसंरक्षक पटले, वनक्षेत्राधिकारी येसनसुरे, तडस यांच्या मार्गदर्शनाखाली नागझिरा - नवेगाव व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक अशोक खुणे, सहाय्यक वनसंरक्षक दिनेश खंडाते यांच्या सहकार्याने पक्षीगणना दोन टप्प्यात पार पडली. (तालुका प्रतिनिधी)