बिबट्याचा धुमाकूळ सुरूच बैलासह शेळ्याही फस्त
By Admin | Updated: November 22, 2014 00:10 IST2014-11-22T00:10:05+5:302014-11-22T00:10:05+5:30
१५ दिवसापुर्वी एका बिबट्याला वनविभागाने पिंजऱ्यात पकडून परिसरातील दहशत थांबविण्याचा प्रयत्न केला.

बिबट्याचा धुमाकूळ सुरूच बैलासह शेळ्याही फस्त
साकोली : १५ दिवसापुर्वी एका बिबट्याला वनविभागाने पिंजऱ्यात पकडून परिसरातील दहशत थांबविण्याचा प्रयत्न केला. वनविभाग या बिबट्याच्या सेवेत असतानाच पुन्हा याच परिसरात दुसऱ्या बिबट्याचा धुमाकूळ सुरू झाला आहे. आठ दिवसात एक बैल व दोन शेळ्या बिबट्याने फस्त केल्यामुळे वनविभागाची डोकेदुखी वाढली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी खांबा, जांभळी येथील पोलीस पाटलांनी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना केली आहे.
१५ दिवसापूर्वी जांभळी येथे एका बिबट्याने ७० वर्षीय वृद्ध महिलेला ठार केले होते. त्यानंतर वनविभागाने या बिबट्याला पिंजऱ्यात पकडून परिसरातील लोकांचा संताप कमी केला. मात्र याच गावाशेजारी दि.१६ व १८ ला तिरंगी टेकाम व छोटेलाल रहांगडाले यांच्या घरच्या गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्या बिबट्याने फस्त केल्या. प्रल्हाद मानकर रा.आमगाव (खुर्द) यांचा बैल चरायला गेल्यानंतर परत न आल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला गावाशेजारील जंगलात शोधले असता एफडीसीएमच्या कम्पार्टमेंट क्रमांक १४ मध्ये या बैलाला बिबट्याने खाल्लेले आढळून आले.
शुक्रवारला पहाटे वडेगाव येथील मनोहर वैरागडे यांचीही शेळी बिबट्याने फस्त केली. त्यामुळे या परिसरात पुन्हा जिवीत हानी होऊ शकते म्हणून वनविभागाने याही बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी खांबा जांभळीचे पोलीस पाटील यांनी वनविभागाला लेखी तक्रार दिली आहे. वनविभागाने पकडलेला बिबट हा तो नसावा, अशी गावकऱ्यात चर्चा आहेत. या परिसरात असलेल्या बिबटाला पळविण्यासाठी गस्तीवर असलेले वनकर्मचारी फटाके फोडून पळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु हा बिबट्या त्यांच्या जाळ्यात अद्याप अडकलेला नाही. (तालुका प्रतिनिधी)