फिरते पशुचिकित्सालय ‘बेपत्ता’
By Admin | Updated: May 24, 2015 01:12 IST2015-05-24T01:12:50+5:302015-05-24T01:12:50+5:30
वैद्यकीय सेवा उपलब्ध नसलेल्या भागातील गोधनावर घरपोच वैद्यकिय उपचार करण्यासाठी येथे सुरु केलेल्या फिरते पशुचिकित्सालय बंद स्थितीत आहेत.

फिरते पशुचिकित्सालय ‘बेपत्ता’
लाखांदूर : वैद्यकीय सेवा उपलब्ध नसलेल्या भागातील गोधनावर घरपोच वैद्यकिय उपचार करण्यासाठी येथे सुरु केलेल्या फिरते पशुचिकित्सालय बंद स्थितीत आहेत. पशुधन विकास अधिकारी ‘नॉट रिचेबल’ असल्यामुळे या गावातील गोधन उपचारविना संकटात सापडले आहेत.
मागील १५ ते २० वर्षापूर्वी लाखांदूर तालुक्याच्या ठिकाणी फिरते पशुचिकित्सालय सुरु करण्यात आले. यासाठी एक वाहन पशुधन विकास अधिकारी, सहा पशुधन विकास अधिकारी, परिचर व वाहन अशी पदे भरण्यात आलेली होती. फिरते पशुचिकित्सालय असल्यामुळे एक वाहन देण्यात आले होते. यातून दांडेगाव, कोच्छी, मानेगाव, बोरगाव, मुरमाळा, पारडी, मुर्झा, दहेगाव अशा जंगलव्याप्त दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या गोधनावर मोफत औषधोपचार करुन अविरत सेवा पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र काही दिवसात वाहनात बिघाड आल्याने ती मागील १५ वर्षापासून नादुरुस्त कार्यालयाच्या बाहेर पडून आहे. वाहन नसल्याने अधिकाऱ्यांचे फिरणे बंद झालेले आहे. येथील पशुधन अधिकारी नागपूर मुक्कामी राहू लागले. केवळ मिटींग व महत्त्वाच्या कामाकरिता येत असल्याने या शेतकरी त्रस्त झाले आहेत. औषधोपचाराअभावी या भागातील जनावरे साथीच्या रोगाने दगावले आहेत. याउलट अनेक शेतकऱ्यांनी गोधन विक्रीला काढले आहे. यासदंर्भात शेतकऱ्यांनी सदर प्रतिनिधीला तक्रार दिल्यानंतर दवाखान्याला भेट दिली असता त्याठिकाणी केवळ परिचर दिसून आला. सकाळी दवाखाना उघडणे व वेळेत बंद करणे एवढेच काम असल्याचे दिसून आले.
पशुधन विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. या १० जंगलव्याप्त गावात शासनाच्या योजनेतून दूधाळ जनावरांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीकरिता जनावरे अनुदानावर वाटप केलेली जनावरे शेतकऱ्यांकडे दिसून येत नाही. सेवा देत नसताना शासनाच्या वेतनावर नाहक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना हटविण्यात यावे, अशी मागणी गोपालकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)