समाधान शिबिराच्या धरतीवर आनंद मेळावा
By Admin | Updated: July 19, 2016 00:33 IST2016-07-19T00:33:17+5:302016-07-19T00:33:17+5:30
राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना सरळ घेता यावा यासाठी महसूल विभागाने समाधान शिबिराचे आयोजन केले.

समाधान शिबिराच्या धरतीवर आनंद मेळावा
काशीवार यांचा पुढाकार : लाखांदूर पहिला मेळावा
संजय साठवणे साकोली
राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना सरळ घेता यावा यासाठी महसूल विभागाने समाधान शिबिराचे आयोजन केले. याच धर्तीवर जिल्हा परिषदेच्या योजनांचा थेट लाभ नागरिकांना मिळावा यासाठी साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांनी आनंद मेळावा या नवीन उपक्रमाचे आयोजन सुरू केले आहे. याचा पहिला प्रयोग भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे करण्यात आला. महसूल विभागामार्फत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरात जसे लाभार्थ्यांना राशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, आरोग्य सेवा यासह विविध योजनांचा लाभ थेट समाधान शिबिरात देण्यात येतो. या शिबिरात प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्याने जिल्ह्यात या शिबिराचा लाभ अनेकांनी घेतला. मात्र या समाधान शिबिरात जिल्हा परिषद व पंचायत समितीस्तरावरील बऱ्याच योजना लाभार्थ्यापर्यंत पोहचू शकल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी व सामान्य माणसांना वारंवार पंचायत समिती व जिल्हा परिषद येथे चकरा माराव्या लागतात. परिणामी लोकांची कामे खोळंबली व भ्रष्टाचार फोफावत आहे. यावर आळा बसावा, शासनाच्या विविध योजना लोकापर्यंत पोहोचाव्यात यासाठी आ.बाळा काशीवार यांनी साकोली विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदा आनंद मेळाव्याचे आयोजन केले. याचा पहिला प्रयोग लाखांदूर येथे करून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून दिला.
असा आहे आनंद मेळावा
या आनंद मेळाव्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील सर्व विभागाची उपस्थिती राहणार असून यात घरकुल योजना, शौचालय बांधकाम, शेतकऱ्यांना शेतीसाठी अनुदानावर मिळणारे साहित्य वाटप, सोवर कंदील, मुलींना सायकल वाटप यासह अन्य योजनांचा लाभ या आनंद मेळाव्यात मिळणार आहे.
भ्रष्टाचाराला आळा बसेल
बरेचदा लाभार्थी यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये चकरा माराव्या लागतात. संबंधित कर्मचारी चिरीमीरी घेऊन लाभार्थ्यांना लाभ देतात. यामुळे भ्रष्टाचार होऊन खरा लाभार्थी हा योजनेपासून वंचित राहतो. शासनाचा हेतु साध्य होत नाही.
कामात पारदर्शकता येईल
शासनाच्या विविध योजना लोकांच्या, शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत. मात्र अधिकारी व कर्मचारी यामुळे या योजना खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे गरीब हा गरीबच राहतो व श्रीमंत हा अधिक श्रीमंत होतो. त्यामुळे आपण हा नाविण्यपुर्ण उपक्रम सुरू केला असून शासनाच्या सर्व योजनाचा लाभ आता लाभार्थ्यांना मिळणार असून हे आनंद मेळावे प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रात घ्यायचे आहेत. त्यामुळे नागरिकांनी या आनंद मेळाव्याचा लाभ घ्यावा.
- बाळा काशीवार, आमदार साकोली.