कुंभार व्यवसायाला लघु उद्योगाचा दर्जा द्या
By Admin | Updated: May 12, 2014 23:20 IST2014-05-12T23:20:52+5:302014-05-12T23:20:52+5:30
जिल्ह्यात कुंभार समाज मोठय़ा प्रमाणावर असून या व्यावसायिकांचा व्यवसाय थंडबस्त्यात आला आहे.

कुंभार व्यवसायाला लघु उद्योगाचा दर्जा द्या
सानगडी : जिल्ह्यात कुंभार समाज मोठय़ा प्रमाणावर असून या व्यावसायिकांचा व्यवसाय थंडबस्त्यात आला आहे. त्यामुळे शासनाने व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन या व्यवसायाला लघु उद्योगाचा दर्जा मिळवून द्यावा, अशी मागणी कुंभार व्यावसायिकांनी केली आहे. सानगडी परिसरात वळद, सानगडी, बाक्टी येथे मोठय़ा प्रमाणात कुंभार व्यावसायिक आपल्या वंशपरंपरागत व्यवसाय करीत आहेत. मातीची भांडी, थंड पाण्याचे माठ, मातीचे दिवे, नाणे साठविण्याचे गल्ले, विविध प्रकारच्या देवदेवतांच्या मूर्त्या, सुरई, रांजन, लग्न समारंभात लागणारे साहित्य आदी वस्तू तयार करून आणि बाजारात विकून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवीत आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे थंड पाण्याच्या माठाकडे आकर्षिले जात आहेत. माठ, रांजन, सुरई, झरी अशा विविध वस्तू २0 ते २00 रुपयापर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. मातीची भांडी व मूर्ती तयार करण्याकरिता लागणार्या कच्च्या मालाकरिता रंगरंगोटी तसेच थंड पाण्याच्या माठाला सच्छिद्रता आणण्यासाठी लागणारा सोरा खरेदी करुन तयार झालेला पक्का माल बाजारपेठेत नेण्यासाठी बराच खर्च येतो. त्यामुळे खर्च वजा जाता उदरनिर्वाहासाठी कोणतीच रक्कम शिल्लक राहत नाही. परिणामी कुंभार समाजातील नवीन पिढीतील युवा वर्ग आपला वंश परंपरागत व्यवसाय सोडण्याच्या तयारीत आहेत. काही कुटुंब स्थानांतरणाच्या वाटेवर आहेत. येणार्या काळात कुंभार समाजाची आर्थिक स्थिती सुधारली नाही तर कुंभाराचा व्यवसाय नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही. यात तिळमात्र शंका नाही. परंतु, हे चित्र पालटण्याचे चिन्ह दिसत नाही. कुणाचेही या समाजाकडे लक्ष नाही. त्यामुळे हा समाज आहे त्याच स्थितीत आहे. (वार्ताहर)